मौजमजेची हौस, 4 तरुणांनी केलं असं काही की… सीसीटीव्हीमुळे धक्कादायक प्रकार उघड

पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या घरफोडीच्या घटनेत पुणे पोलिसांनी अवघ्या ४ तासांत चार आरोपींना अटक केली आहे. समर्थ पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १५,५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी मौजमजेसाठी ही चोरी केल्याचे कबूल केले आहे. या घटनेने व्यापारी वर्गाने दिलासा मिळाला आहे.

मौजमजेची हौस, 4 तरुणांनी केलं असं काही की... सीसीटीव्हीमुळे धक्कादायक प्रकार उघड
फोटो प्रातनिधिक
| Updated on: Jul 10, 2025 | 4:42 PM

मौजमजेच्या नावाखाली घरफोड्या करून दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अवघ्या ४ तासांत गजाआड केले आहे. पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईमुळे व्यापारी वर्गाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. सुजल राजन परदेशी (वय २०), सुभाष राजेश सरोज (वय २१), नितीन दिलीप सरोज (वय २२) आणि रोहित मुन्नालाल सरोज (वय २२) अशी या चार आरोपींची नाव आहे. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी ५ जुलै २०२५ ला रात्री आणि ६ जुलै २०२५ च्या पहाटेच्या सुमारास नाना पेठ येथील शार्प कलर दुकानाचे शटर वाकवून, ते उचकटून आणि कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले १५,५०० रुपये त्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास पथकाने तात्काळ सूत्रे हलवली.

पोलीस अंमलदार अमोल गावडे आणि इम्रान शेख यांनी घटनास्थळाची पाहणी करत आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी केली. त्याचबरोबर, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला. पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले. त्यांनी अवघ्या चार तासांत या चोरट्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

कसून चौकशी सुरु

सुजल राजन परदेशी (वय २०), सुभाष राजेश सरोज (वय २१), नितीन दिलीप सरोज (वय २२) आणि रोहित मुन्नालाल सरोज (वय २२) अशी या चार आरोपींची नाव आहे.पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मौजमजेसाठीच ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेली रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे. त्यांना दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांच्यावर गु.र.नं १५०/२०२५ भा.न्या.सं.क.३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.