Pune Porsche Case : ‘मुंबई से आया मेरा दोस्त…’ जामिनावर सुटताच अग्रवाल कुटुंबाची आलिशान पार्टी? Video व्हायरल

| Updated on: May 28, 2026 | 7:42 AM

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल जामिनावर सुटताच कुटुंबियांसोबत आलिशान पार्टी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुण्यातील बहुचर्चित आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर, अवघ्या महिनाभरातच या कुटुंबाने एक आलिशान पार्टी केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक सोशल मीडिया युजर्स आणि पीडित कुटुंबियांकडून अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे.

गळ्यात नोटांचा हार आणि गाण्यावर डान्स

या व्हिडीओत तुरुंगातून सुटलेले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल हे त्यांची पत्नी आणि मुलासोबत बेधुंद होऊन नाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या गळ्यात नोटांचा हार असल्याचे पाहायला मिळत आहे. हे कुटुंब मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्तों सलाम करो या गाण्यावर थिरकत असल्याचे व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ एका पार्टी क्लबमधला असून तो सध्या तुफान व्हायरल होत आहे. पुण्यातील पोर्श कार अपघातात दोन निष्पाप व्यक्तींचा जीव घेतल्यानंतर या कुटुंबाला कसलाही पश्चाताप नसल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

पुणे पोर्श अपघात प्रकरण नेमकं काय?

मे २०२४ मध्ये पुण्यातील कल्याणीनगर भागात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत आलिशान पोर्श कार भरधाव वेगाने चालवत दोन तरुण आयटी इंजिनिअर्सना जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे होते. अपघातानंतर अवघ्या काही तासांतच बाल न्याय मंडळाने (JJB) आरोपीला रस्ते सुरक्षेवर ३०० शब्दांचा निबंध लिहिणे आणि काही दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करणे अशा अत्यंत किरकोळ अटींवर जामीन मंजूर केला होता. या निर्णयामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती.

त्यानंतरच्या पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर केल्याचे उघड झाले. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना लाच देणे, तसेच अपघाताची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी त्यांच्या घरच्या चालकावर दबाव टाकून त्याचे अपहरण करणे, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना अटक करण्यात आली होती.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमुळे सध्या अग्रवाल कुटुंबाला जोरदार ट्रोल होत आहे. हा केवळ डान्स नसून पैशाच्या जोरावर कायद्याला दाखवलेला अंगठा आहे, अशा शब्दांत युजर्स आपला संताप व्यक्त करत आहेत. याप्रकरणी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

 

Published on: May 28, 2026 7:39 AM
Follow Us