पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, पानशेतसह पाच धरणे ओव्हरफ्लो

| Updated on: Aug 06, 2021 | 9:02 AM

पुणे जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, कळमोडी, चासकमान आणि आंद्रा ही पाच धरणे पूर्ण भरली आहेत. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये 27.59 टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, पानशेतसह पाच धरणे ओव्हरफ्लो
पानशेत धरण
Follow us on

पुणे : पुणे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. पुणे जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे गुरुवारअखेर पानशेतसह पाच धरणे ओव्हरफ्लो झाली. तर इतर सहा धरणांमध्ये 92 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला असून तीही भरण्याच्या मार्गावर आहेत.

पुणे जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, कळमोडी, चासकमान आणि आंद्रा ही पाच धरणे पूर्ण भरली आहेत. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये 27.59 टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. खडकवासला प्रकल्पात 27.59 टीएमसी अर्थात 94.64 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी पाच ऑगस्टअखेरपर्यंत खडकवासला प्रकल्पात 12.07 टीएमसी इतकाच पाणीसाठा होता. मात्र यंदा त्याच तारखेपर्यंत दुपटीहून अधिक पाणीसाठा आहे.

2015 पासून आतापर्यंत जून आणि जुलै या पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांचा विचार केल्यास धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. पुणे जिल्ह्याला शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. टेमघर धरण परिसरात दोन हजार मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात प्रत्येकी 1500 मिमी पाऊस झाला. तर खडकवासला धरण परिसरात 450 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यानुसार या चारही धरणांच्या परिसरात यंदा आतापर्यंत सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुण्यातील चासकमान धरण 100 टक्के भरले

पुणे जिल्ह्यातील खेड व शिरूर तालुक्यातील शेतीचे नंदनवन करणारे चासकमान धरण हे 100 टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळेच चासकमान धरण पूर्ण भरून वाहायला लागले आहे. चासकमान धरणात पाणी साठवण्याची क्षमता 8.50 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 दिवस आधीच हे धरण भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन धरणाच्या पाचही दरवाजाद्वारे भीमानदी पात्रात 925 क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर पॉवर हाऊसमधून 550 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून भीमानदी काठावरच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्याला मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळणार

पुणे शहराला मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला मंजूर केला आहे. महापालिका हद्दीत नव्याने आलेल्या 23 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मुळशी धरणामधून 5 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी द्यावे असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल.

पुण्याची लोकसंख्या वाढत असल्याने पाणी कोटा वाढवावा अशी मागणी गेल्या काही वर्षापासून महापालिका करत आहे. महापालिका हद्दीपासून सुमारे 40 किलोमीटर लांब असलेल्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाची मान्यता मिळावी यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

हेही वाचा :

जुन्नरमधील पर्यटनस्थळांवर मज्जाव, कलम 144 लागू करुनही पर्यटकांची गर्दी कायम

डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी