जुन्नरमधील पर्यटनस्थळांवर मज्जाव, कलम 144 लागू करुनही पर्यटकांची गर्दी कायम

नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करु नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने नुकतेच केले होते. परंतु त्यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले

जुन्नरमधील पर्यटनस्थळांवर मज्जाव, कलम 144 लागू करुनही पर्यटकांची गर्दी कायम
जुन्नरमधील पर्यटन स्थळांवर जमावबंदी

जयवंत शिरतर, टीव्ही 9 मराठी, जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा पर्यटन तालुका आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तरीही गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते. वारंवार आवाहन करुनही नागरिक गर्दी करत असल्याने अखेर (16 जुलैपासून) जुन्नर मधील पर्यटनस्थळी कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करु नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने नुकतेच केले होते. परंतु त्यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर जुन्नरमधील पर्यटन स्थळांवर 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पर्यटकांना काय करण्यास मज्जाव?

वेगाने वाहणाऱ्या किंवा खोल पाण्यात उतरणे, त्यात पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे आणि कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे, उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते, धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, अशा प्रकारांना बंदी लावण्यात आली आहे.

कोणकोणत्या पर्यटनस्थळी नियम लागू?

जुन्नर तालुक्यातील नाणेघाट, दारे घाट, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र, शिवनेरी किल्ला, चावंड किल्ला, हडसर किल्ला या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहणार आहेत. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे स्थानिक पोलीस प्रशासन व जुन्नर पोलीसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर कलम 144, पर्यटनासाठी बाहेर पडाल तर कारवाई होणारच!

डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी

(Pune Tourist Spots in Junnar Section 144 Tourists still roaming)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI