व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला, शरद पवारांना डिस्चार्ज, फोटो व्हायरल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. व्हिलचेअरवरून बाहेर आल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावला, ज्याचे फोटो व्हायरल झाले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना अखेर आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पवारांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. आता रुग्णालयातून पवार बारामतीच्या घरी न जाता थेट मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे असणार आहेत. डॉक्टरांनी पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला असून पवार यांची प्रकृती आता ठणठणीत असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा दुष्काळी पाहणीचा दौरा रद्द करण्यात आला होता. तसेच त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. शरद पवार यांना कफ झाला होता. तसेच त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. विविध चाचण्याही करण्यात आल्या होत्या. त्यांची प्रकृती आता स्थिर झाल्याने त्यांना दोन दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बाहेर आले, हात उंचावले
दरम्यान, शरद पवार यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते रुग्णालयाच्या बाहेर आले. व्हिलचेअरवरूनच ते बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हात उंचावले. त्यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर कारमध्ये बसले आणि मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. रुग्णालयातून निघण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयाचे डॉक्टर आणि सर्व स्टाफचे हातजोडून आभार मानले.
Sharad Pawar
थेट मुंबईला येणार
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे बारामतीच्या घरी जातील अशी चर्चा होती. पण पवार हे मुंबईला यायला निघाले आहेत. थेट रुग्णालयातून मुंबईच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवार येणार आहेत. या ठिकाणी पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठ दिवस आराम करणार आहेत. दिवाळीनंतर पवार पुन्हा एकदा दुष्काळाची पाहणी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मोदींचा फोन
दरम्यान, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.