Sunil Tatkare: ‘त्यांचं नाव घेऊन…’, रामदास कदम यांना एका ओळीतच सुनील तटकरे यांचा सणसणीत टोला, म्हणाले काय?
Sunil Tatkare on Ramdas Kadam: अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी शिवसेने नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वाक्यात सोक्षमोक्ष लावला. त्यांनी पलटवार करण्याचे मोठे संकेत दिले. आज बारामतीत आल्यावर काय म्हणाले तटकरे?

Sunil Tatkare on Ramdas Kadam: माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात यावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी तर मध्यंतरी यावरून मोठे वादळ उठवले होते. तर सोमवारी ऐन दिवाळीतच शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात आरोपांची लडच लावली. त्यांनी अपघातावरून तटकरे यांच्यावर संशयाचा बॉम्ब फोडला आणि विमान अपघातामागे तटकरेंचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि थेट चौकशीची मागणी केली. आज तटकरे हे अजितदादांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी बारामती येथे आले. तेव्हा त्यांनी रामदासभाईंना सणसणीत टोला लगावला, काय म्हणाले तटकरे?
दादांशिवाय बारामतीत येण्याचा दुर्दैवी, अभागी क्षण आम्हा सर्वांवरती आला. त्याच्या प्रचंड वेदना, दुःख मनात साठवलेले आहे. गेल्या तीन दशकं आवर्जून पाडव्याला बारामतीला आलो. बारामतीचा उसळलेला महासागर अनुभवला आहे. दादांची भेट होत होती. शरद पवार यांनाही भेटण्याचा योग आला. आज दादांशिवाय पाडवा हे कधी मनाला पटूच शकत नाही. नियतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. पाडव्याच्या शुभेच्छा त्यांच्याकडून घ्याव्यात या कृतज्ञतेच्या भूमिकेतून इथं आलो आहे. या पवित्र स्मृतीस्थळी आलो आहे, त्यामुळे कुठलंही राजकीय भाष्य मी करणार नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.
रामदास कदम यांना सणसणीत टोला
शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर तटकरे व्यक्त झाले. कदम यांच्यावर कालच मी बोलो आहे. त्यांचं नाव घेऊन या पवित्र जागेच माहात्म्य मला कमी करायचे नाही. ही पवित्र जागा अशी आहे, जिथे पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी करोडो वारकरी संप्रदाय जात असतो. माझ्यासारखे असे करोडो वारकरी आहेत. जे बारामतीला पंढरी मानतात. शरद पवार यांच्यापासून दादा आमचे सर्वस्व आहेत. आज या ठिकाणी आलो असल्याने कुणाचे तरी नाव घेऊन, त्यावर प्रतिक्रिया देऊन या पवित्र जागेचे महात्म्य मला कमी करायचे नाही. ते अबाधित ठेवायचे आहे, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.
रामदास कदम यांचा आरोप काय?
शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामागे सुनील तटकरे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी याप्रकरणी तटकरे यांची सखोल तपासणी करण्याची मागणीही केली होती. तटकरे यांनी कालच हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी कदम यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. दरम्यान शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा कदम यांची बाजू उचलत तटकरे यांची चौकशी करण्याची मागणी केली.