Vivekanand Patil: तडाखेबंद भाषणाने MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोण? आयोगाला घाम फोडणारा कोल्हापूरी तालमीतील हा वस्ताद तरी कोण?
Vivekanand Patil MPSC Agitation Pune : आमदार फुटले, खासदार फुटले, MPSC चे पेपर फुटले आता बालवाडीचे पेपर फुटायची वेळ येऊ देऊ नका, अशा खुमासदार भाषणाने विवेकानंद पाटील याने तरुणाईला वेड लावले आहे. कोल्हापूरी तालमीतील हा वस्ताद आहे तरी कोण?

खरातच्या टेबलावरून महाराष्ट्राला प्रबोधनकारांच्या सावलीत आणायचा आहे… मोडा मान माझी, मी वाकणार नाही… असो की आमदार फुटले, खासदार फुटले, MPSC चे पेपर फुटले आता बालवाडीचे पेपर फुटायची वेळ येऊ देऊ नका, अशा खुमासदार भाषणाने ज्वलंत प्रश्न चव्हाट्यावर आणणारा विवेकानंद पाटील तरुणाईचा आयकॉन ठरला आहे. पुण्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राज्य ढवळून निघाले आहे. या आंदोलनात हजारो विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर ठिय्या देऊन आहेत. आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाला बळ दिले. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार ओमराजे निंबाळकरच, विश्वजीत कदम नाही तर अनेक मान्यवरांनी या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या. या सर्व दिग्गजांसमोर विवेकानंद पाटील याने जी काही फटकेबाजी केली. तडाखेबंद भाषणं ठोकली, त्यामुळे MPSC अध्यक्षच नाही तर सरकारलाही घाम फुटला.
कोण आहे विवेकानंद पाटील?
आपल्या खास कोल्हापूरी लकबीत, रांगड्या शैलीत अस्सल देशी स्वॅगने अवघ्या काही काळातच विवेकानंद पाटील हा एमपीएससी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्याचा दमदार भाषणाने राज्याचे लक्ष वेधले आहे. कोणताही मुलाहिजा न बाळगता त्याने खणखणीत भाषणं ठोकली आहेत. सोशल मीडियावर त्याचा जणू स्वॅग सुरू आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत धुमाकूळ घालणारा विवेकानंद पाटील हा तसा कोल्हापूरच्या तालमीतील आहे. 24 वर्षांचा विवेकानंद पाटील पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यातील माजगाव येथील रहिवाशी आहे. आपल्या इरसाल भाषणाने त्यांना आंदोलक विद्यार्थ्यांचा उत्साह मावळू दिला नाही. तर त्याचवेळी भेटीला आलेल्या दिग्गजांनाही हसता हसता ज्वलंत प्रश्नावर बोलतं केलं आहे. त्याच्या खणखणीत भाषणानं आयोगालाच नाही तर सरकारलाही वेळीच काही निर्णय घेण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. त्याच्या भाषणाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
खुमासदार भाषणानं चढला रंग
खरातच्या टेबलावरील महाराष्ट्राला प्रबोधनकारांच्या सावलीत आणायचा आहे, अशा सणसणीत शब्द संवादाने विवेकानंद पाटील याच्या भाषणाची सुरुवात होते. त्यावेळी त्याची लकब, शब्द संवाद आणि अस्सल रांगड्या कोल्हापूरीचा झटका ऐकून काहींची हसून हसून मुरकुंडी वळते. या शब्दफेकीतून तो सध्याच्या समाजाचे भीषण वास्तव मांडतोच. पण सरकारच्या निर्णयावर प्रखर टीकाही करतो.
आम्ही शेतकरी आणि गोरगरिबांची लेकरं आहोत. 50-50 लाख रुपये देऊन वशिल्याने नोकऱ्या विकत घेण्याची आमची कुवत कुठे, अशा शब्दांनी तो सरकारलाही घाम फोडतो. आमदार फुटले, खासदार फुटले, पक्ष ही फुटले इतके दुःख झाले नाही. पण आमचा एमपीएससीचा पेपर फुटला, तेव्हा आम्हाला वाटलं जणू आभाळाचं फाटलं, आता बालावाडीचा पेपर फुटल्याची वेळ येऊ देऊ नका, असा टोलाही तो लगावतो. तर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच तुमची राष्ट्रवादी फुटली, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली, आमचा MPSC चा पेपर फुटला, आता आपण समदु:खी आहोत, या त्याच्या उपरोधिक टोल्यांमुळे सध्याचे राजकीय भीषण वास्तवही समोर येते.