
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरुन वाद सुरु आहे. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या भाषिक वादाचे पडसाद उमटत आहे. त्यातच मिरजेतून एक अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. मिरजेच्या महाराणा प्रताप चौकात एक पंजाबी तरुण अक्षरशः मराठीच्या स्वाभिमानासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या या कृतीने अनेकांना थक्क केले आहे. दलजितसिंग रामगडिया असे या तरुणाचे नाव आहे.
राज्यात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असताना, दलजितसिंग रामगडिया हे एक पोस्टर घेऊन मिरजेतील महाराणा प्रताप चौकात उभे राहिले. यावेळी त्यांनी या पोस्टरवर मी पंजाबी, पण मी महाराष्ट्राचा! मी मराठीच बोलतो, मला मराठी भाषेचा अभिमान आहे, असे म्हटले आहे. त्यांच्या या कृतीने एकतेचा संदेश दिला आहे. भर चौकात त्यांनी ज्या आत्मविश्वासाने मराठीचा अभिमान व्यक्त केला, ते पाहून उपस्थित नागरिक केवळ कुतूहलाने पाहायला लागले. तर त्यांनी दलजितसिंग यांच्या भूमिकेला दाद दिली. अनेकांनी त्यांच्याभोवती गर्दी करुन या अनोख्या घटनेचे साक्षीदार होण्याचा आनंद घेतला.
मिरज शहरात अनेक पंजाबी कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायानिमित्त स्थायिक झाली आहेत. या कुटुंबांनी केवळ व्यवसायच केला नाही, तर येथील मराठी संस्कृतीशी ते पूर्णपणे एकरूप झाले आहेत. ही मंडळी अस्खलित मराठी बोलतात, इतकेच नाही तर मराठी सण-उत्सवांमध्येही ते तितक्याच उत्साहाने सहभागी होतात. दलजितसिंग यांचे कुटुंब १९७० पासून मिरजेत वास्तव्यास आहे. त्यांच्या औद्योगिक वसाहतीत वे-ब्रिजचा व्यवसाय आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबाच्या दोन पिढ्या मराठी शाळेत शिकल्या आहेत. त्यासोबतच आता त्यांची तिसरी पिढीही मराठी शाळेतच शिक्षण घेत आहे. ही बाब त्यांच्या मराठी भाषेवरील निष्ठेची आणि महाराष्ट्राशी असलेल्या घट्ट नात्याची प्रचिती देते.
दलजितसिंग रामगडिया यांनी केलेल्या कृतीतून केवळ मराठी भाषेवरील प्रेमच पाहायला मिळत नाही, तर त्यांनी कशाप्रकारे स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेतले आहे हे देखील दिसत आहे. “मी जरी पंजाबी असलो तरी माझे येथील संस्कार मराठी आहेत आणि मी मराठीच बोलतो,” असे दलजितसिंग रामगडिया हे मोठ्या अभिमानाने सांगतात. इतकेच नाही, तर त्यांनी “मराठी ही आपली मातृभाषा आहे, आपण सर्वांनी मराठीतच बोला.”, असे आवाहन महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला केले आहे. दलजितसिंग यांच्या कृतीने त्यांचे कौतुक केले जात आहे.