पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळावरून शेतकरी आक्रमक, आंदोलकांना बैलगाडा धडकल्याने अनेकजण जखमी
पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या भूमी संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. ३ मे रोजी झालेल्या हिंसक आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला. दगडफेकी आणि बैलगाडा हल्ल्यामुळे अनेक जखमी झाले.

पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या भू संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. या स्थानिक शेतकऱ्यांचे आंदोलन काल (३ मे २०२५) अधिक हिंसक झाले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. ज्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात मोठी धुमश्चक्री झाली. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 300 ते 400 आंदोलकांवर विविध गुन्हे दाखल केले आहेत. तर काही जणांना ताब्यात घेतले आहे.
विमानतळ परिसरात मोर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, काल आंदोलकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विमानतळ परिसरात मोर्चा काढला होता. एका आंदोलकाने शर्यतीचा बैलगाडा महिला आंदोलकांच्या अंगावरून चालवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ ‘टीव्ही 9 मराठी’ च्या हाती लागला आहे. पोलिसांनी या बैलगाडा चालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणणे, पोलिसांना किरकोळ जखमी करणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या आरोपांखाली 300 ते 400 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक यांनी दिली.
यापैकी 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून व्हिडीओच्या आधारे इतर आंदोलकांची ओळख पटवून त्यांनाही ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या झटापटीत 13 पोलीस अंमलदार आणि 3 अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सासवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत, असे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
दरम्यान, राज्याचे भू संपादनमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “पुरंदर विमानतळासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. भू संपादन मंत्री म्हणून मी स्वतः शेतकऱ्यांशी चर्चा करेन. जमिनीचे कमी दर मिळाले असतील किंवा आंदोलकांच्या मुलांना विमानतळात नोकरी लावण्यासंबंधी काही अडचणी असतील, तर त्या आम्हाला सांगा. मात्र, कोणाचाही जीव धोक्यात येणे आम्हाला मान्य नाही.” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
250 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल
रात्री उशिरा सासवड पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणखी 250 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कुंभारवळण आणि एखतपूर गावातील 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काल झालेल्या दगडफेकीचे व्हिडिओ पोलिसांकडे असून, त्या आधारे इतर दगडफेक करणाऱ्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पुरंदरमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता, पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
