तर राजीनामा देणार, लवकरच मी…मंत्र्याच्या थेट विधानाने खळबळ; काय घडतंय?
मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे रोजीपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर मंत्री राधाकृषण विखे पाटील यांनी सरकारची भूमिके मांडली आहे.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारविरोधात रणशिंग फुकले असून थेट आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. ते येत्या 30 मे रोजीपासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सातारा गॅझेट लागू करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आरक्षणाविषयी सरकारची भूमिका मांडली आहे. तसेच माझ्या राजीनाम्याने जरांगे यांचे समाधान होत असेल तर मी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असेही ते म्हणाले आहेत.
हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी सुरू झाली
राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष झाल्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीची सुरुवात मी सुरुवात केली. आपण अडीच लाख कुणबी दाखले दिलेले आहेत. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचा अध्यक्ष म्हणून मी सर्व आमदारांना पत्र पाठवले आहेत. स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक आमदारांनी प्रयत्न करायला हवेत. सातारा गॅजेटची प्रक्रिया आम्ही आता सुरू केली आहे. सातारा गॅझेटची अंमलबजावणी झालेली नाही हे आम्ही मान्य करतो मात्र प्रक्रिया सुरू आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
तर मी राजीनामा द्यायला तयार आहे
आतापर्यंत आपण मराठा आरक्षणासंदर्भात जे जे काही निर्णय घेतले त्यांना कुठल्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. आंदोलनादरम्यान निधन झालेल्या मराठा आंदोलकांच्या मुलांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. एसटी महामंडळात आम्ही त्यांना नोकरी देत होतो, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. आता महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यासंदर्भामध्ये आम्ही विनंती केली आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसेच उपसमितीचा अध्यक्ष म्हणून माझा राजीनामा दिल्याने जरांगे पाटलांचे समाधान होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असेही विखे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे यांची भेट घेणार
तसेच, मी लवकरच जरांगे पाटलांना भेटेल आणि आतपर्यंत केलेल्या कामाची माहिती त्यांना देईल. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते मी दूर करण्याचा प्रयत्न करेल, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.