
अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यातील जाहीर जुगलबंदीने राहुरीतील राजकीय मेळाव्यात चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे. स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी एक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सुजय विखे यांनी स्वत:च्या वडिलांना व्यासपीठावरून दिलेला सल्ला चर्चेचा विषय ठरला आहे.
राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी कर्डिले समर्थकांनी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे, नगरचे आमदार संग्राम जगताप आणि अक्षय कर्डिले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणादरम्यान सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रवृत्तीवर अत्यंत थेट भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याने व्यासपीठावर आणि उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला होता. गाडीत बसणारे कार्यकर्ते सर्वात घातक प्राणी असतात. नेत्याच्या गाडीत बसायला जो घाई करतो, तो लावालावी केल्याशिवाय उतरत नाही. त्यामुळे, विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांपासून सावध राहिले पाहिजे, असा सल्ला सुजय विखेंनी अक्षय कर्डिलेसह वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला आहे.
मुलाने दिलेल्या या सल्ल्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तितकीच बोलकी प्रतिक्रिया दिली. मी सहसा गाडीत कुणाला घेत नाही, मात्र कार्यकर्ते ज्यावेळी गाडीत बसतात. त्यावेळी आपले कान पक्के ठेवले पाहिजे. गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांचे किती ऐकायचे आणि किती सोडून द्यायचे हे आपण ठरवायचे. मात्र सुजयने दिलेला सल्ला सर्वांसाठीच महत्वाचा आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणाले.
दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीच्या मागणीवरही आपले मत स्पष्ट केले. शिवाजी कर्डिले यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच वेदना झाल्या आहेत. अक्षयच्या बाबतीत कार्यकर्त्यांचा जोरदार आग्रह आहे. हा कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन, पक्ष श्रेष्ठींकडे आम्ही त्याबाबत निश्चितच आग्रह धरू. यामुळे, राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळत आहेत.