
कोकणच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरत गोगावले यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांच्यासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.
रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे यांचा मोठा दबदबा आहे. मात्र भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना होमग्राऊंडवर सुरुंग लावला आहे. महाडमध्ये तटकरेंच्या रणनीतीला भरत गोगावलेंनी खिंडार पाडले आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेला हुलकावणी देणारे नगराध्यक्षपद यंदा भरत गोगावलेंनी खेचून आणले आहे. शिवसेनेचे सुनील कविस्कर यांनी नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला असून, पक्षाचे ८ नगरसेवकही निवडून आले आहेत.
या निकालानंतर भरत गोगावले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय म्हणजे जनतेने विकासकामांना दिलेला कौल आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेने जो विश्वास दाखवला, त्याचे आम्ही निश्चितच सोनं करू. आमचे ५ उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले याचे शल्य नक्कीच आहे, पण आम्ही महाडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे भरत गोगावले म्हणाले.
यावेळी भरत गोगावले यांनी महाड आणि श्रीवर्धनमधील निकालावरही भाष्य करत तटकरेंवर टीका केली. दुसऱ्यांच्या भांड्यात डोकावताना आपलं भांडं स्वच्छ आहे का हे बघायला हवं होतं. श्रीवर्धनमध्ये आम्ही चमत्कार केला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला.
दरम्यान गेल्या काही काळापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. गोगावले यांनी उघडपणे या पदावर आपला दावा सांगितला आहे. तर सुनील तटकरे यांनीही पालकमंत्रीपद हवे असं सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यात कमालीचा वाद दिसून येत आहे. त्यातच आता महाडमध्ये राष्ट्रवादीला धूळ चारल्यानंतर आता जिल्हा राजकारणात भरत गोगावलेंची ताकद वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी त्यांचा दावा अधिक प्रबळ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.