
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अनेक भागात पावसाचे थैमान सुरूच आहे. मांडवी किनार्यावर लाटांचे रौद्ररूप उसळले आहे. गेल्या 24 तासांपासून रेल्वे गाड्या स्थानकावर उभ्या आहेत. बोगद्यामध्ये दरड कोसळून ती ट्रॅकवर आल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर रात्र काढावी लागली. रेल्वे स्टेशनवर ट्रेन होण्याच्या प्रतीक्षेत प्रवाशी आहेत. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा कोकणासह राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज आहे. सातारा, रत्नागिरी जिल्ह्यास पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. राज्यातील इतर भागांत ऑरेंज अन् यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नागपूर, रायगड, गडचिरोली भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. 18 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र घाटमथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. विदर्भला पण ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे घाट पर्यटनाला जाताना काळजी घ्या, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, कोकण रेल्वेच्या ट्रॅकवरील दगड हटवली आहेत. आता ट्रॅकवरील माती बाजूला करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. गटारे स्वच्छ काम करण्याच काम प्रगती पथावर आहे. पण गेल्या २४ तासांपासून कोकण रेल्वे ठप्पच आहे. रेल्वे सुरु होण्यास अजून काही तास लागणार आहेत.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दिवाणखवटी बोगद्याजवळ शनिवारी दरड कोसळली आहे. त्यानंतर गेल्या 14 तासांपासून रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. कोकण रेल्वे अजूनही सुरु होण्यासाठी दोन ते तीन तास लागणार आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखलाचे साम्रज्य आहे. जवळपास 100 कामगारांच्या मदतीने ट्रॅवरवरील माती हटवण्याचे काम सुरु आहे. खेड रेल्वे स्टेशनवर काही रेल्वे गाड्या थांबवल्या आहेत.
कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे आता परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध स्टेशनवरून खोळंबलेल्या प्रवाशांना एसटी बसच्या माध्यमातून सोडले जाणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरती शेकडो प्रवासी एसटी बसच्या प्रतीक्षेत आहे. रत्नागिरी स्टेशनवरून 25 बस सोडल्या जाणार आहेत. एसटीच्या बसने अडकलेल्या प्रवाशांना थेट मुंबईत सोडले जाणार आहे.
कोकण रेल्वेकडून सात ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मंगळूरु एक्स्प्रेस, कोकण कन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस, सावंतवाडी मडगाव पॅसेजर ट्रेनचा समावेश आहे. तसेच पाच रेल्वे दुसऱ्या मार्गाने वळवल्या आहेत. दुसरीकडे रत्नागिरी शहरातील मांडवी किनाऱ्यावरच्या धक्क्यावरून लाटा पलीकडे गेल्या आहे. लांटांचे रौद्ररुप किनाऱ्यावर दिसत आहे. चार मीटर उंचीच्या लाटा उसळत आहे. यामुळे लाटा पाहण्यासाठी किनारपट्टी भागात जाऊ नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चिपळूणच्या खेर्डी भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. कोकणातील अतिवृष्टीमुळे आणि कोसळलेल्या दरडीमुळे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरही रेल्वे प्रवाशी खोळंबले आहेत. त्याची माहिती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड-रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन प्रवाशांची भेट घेतली. तसेच या प्रवाशांच्या जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.