Rain Alert : ऐन दिवाळीत पाऊस कोसळणार; ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे वातावरण फिरलं, राज्यात पुढील 4 दिवसात..
राज्यातील काही भागात ऐन दिवाळीत धो धो पाऊस कोळण्याची शक्यता आहे. 'मुरासू' चक्रीवादळामुळे वातावरण फिरलं असून राज्यात पुढील 4 दिवसात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागराच्या निर्माण झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे वातावरण फिरलं आहे. या वादळाचा फटका आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीला बसणार आहे. या समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्याचा परिणाम हा महाराष्ट्रावरही जाणवणार आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.
भारतीय हवामानाचे पुणे विभाग प्रमुख एस. डी. सानप यांनी म्हटलं की, ‘ सध्या होत असलेल्या पावसामुळे धरणे भरण्याची शक्यता कमीच आहे. राज्यात येत्या सहा तारखेपासून हवामान बदल होऊन थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होईल. येणाऱ्या चार दिवसात राज्यात सर्वदूर पाऊस नसेल, मात्र काही ठिकाणी तुरळक पाऊस होईल. राज्यात काल पुणे आणि नाशिक अशा काही ठिकाणीचं पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.. राज्यात सर्वीकडेच पाऊस होईल अशी सद्यस्थितीत परिस्थिती नाही, असाही भारतीय हवामानाच्या पुणे विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागात पाच नोव्हेंबर रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर 4 नोव्हेंबर रोजी देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर राज्यातील काही भागात 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची मोठी शक्यता आहे. तर आज देखील काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा जोर अधिक दिसण्याची शक्यता आहे.
थंडीचं आगमन लांबणीवर
यंदा थंडीचे आगमन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्येही उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हिवाळ्यात उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो. या कारणास्तव यंदा हिवाळ्याचे आगमन लांबण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या मासिक अंदाजानुसार, गुजरात आणि राजस्थानमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागांनाही त्याची झळ बसण्याची शक्यता आहे.
