Uddhav – Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीला ग्रहण… उद्धव ठाकरेंचा तो प्रस्ताव राज यांनी नाकारला, प्रभाग समितीच्या निवडणुकीत मोठा फटका बसणार?

स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसेची नाराजी कायम असून, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव नाकारला आहे. मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे प्रभाग समिती निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई महापालिका राजकारणात ठाकरे बंधूंमधील मतभेद अधिक वाढले आहेत.

Uddhav - Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीला ग्रहण... उद्धव ठाकरेंचा तो प्रस्ताव राज यांनी नाकारला, प्रभाग समितीच्या निवडणुकीत मोठा फटका बसणार?
उद्धव - राज ठाकरे
| Edited By: | Updated on: Mar 04, 2026 | 11:10 AM

मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र लढलेल्या उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधुंच्या युतीला आता ग्रहण लागलं आहे. मनसेला स्वीकृत नगरसेवकपद न दिल्याने राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यानंतर राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सलगी वाढवली आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. राज ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रभाग समिती अध्यक्षपदाची ऑफर दिली होती. पण ही ऑफरही राज ठाकरे यांनी नाकारली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत राज ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मनसेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मनसेला प्रभाग समितीचं अध्यक्षपद देऊ केलं आहे. पण राज ठाकरे यांनी ही ऑफर नाकारल्याने ठाकरे गटाची मोठी गोची झाली आहे. प्रभाग समितीच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचं नुकसान होऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.

एका नगरसेवकपदासाठी…

स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यामुळे मनसेची उद्धव ठाकरेंच्या सेनेवर नाराजी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगर पालिकेत 3 स्वीकृत नगरसेवक झाले. या पैकी एक नगरसेवक मनसेचा व्हावा, अशी मनसेची अपेक्षा होती. स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे काही प्रभाग समितीचे अध्यक्ष पद ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होते, अशा पद्धतीची माहिती आहे. मात्र आता प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार आहे. त्यामुळे ठाकरे सेनेची गोची होणार आहे. मुंबईतील 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज सादर केले जाणार आहेत.

आम्ही एकत्रच आहोत…

दरम्यान, राज ठाकरे यांच्या नाराजीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही बंधूमध्ये तणाव असेल तर राज ठाकरेंना भेटू. त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. मी नेहमी जातो, राज ठाकरेंना भेटत असतो. उद्धव ठाकरेही जातील. फक्त मीडियाने हा विषय ताणू नये. आम्ही एकत्रच आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

तीन टप्प्यांत निवडणुका, राजकीय रंगत वाढली

मुंबई महापालिकेतील 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडेल. पुढील तीन दिवसांत या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. महापौर-उपमहापौर निवडीनंतर ही पहिली मोठी राजकीय चाचणी मानली जात असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.

निवडणूक कार्यक्रम

१) 5 मार्च (गुरुवार) – सी, डी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण, पी दक्षिण प्रभागाच्या निवडणुका.

२) 6 मार्च (शुक्रवार) – जी उत्तर, जी दक्षिण, पी उत्तर, पी दक्षिण, के पूर्व, के पश्चिम प्रभागाच्या निवडणुका.

३) 9 मार्च (सोमवार) – एल, एम पश्चिम, एम पूर्व, एन, एस, टी प्रभागाच्या निवडणुका.

(काही प्रभागांमध्ये बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त केली जात आहे)

असं असेल सत्ता समीकरण

– 17 पैकी सुमारे 9 प्रभाग समित्यांवर महायुतीचे वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे.

– उर्वरित प्रभागांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यात चुरस अपेक्षित आहे.

– काही ठिकाणी सदस्यसंख्या समसमान असल्याने क्रॉस व्होटिंग किंवा तटस्थ भूमिकेचा प्रभाव पडू शकतो.

– 1-2 प्रभागांमध्ये बिनविरोध निवडीची शक्यताही वर्तवली जाते.

का महत्त्वाच्या आहेत प्रभाग समित्या?

– प्रभाग समित्या म्हणजे स्थानिक पातळीवरील निर्णयांचे केंद्र.

– रस्ते, पाणी, गटार, स्थानिक विकासकामे यांवरील प्राथमिक नियंत्रण या समित्यांकडे असते.

– अध्यक्षपद मिळवणे म्हणजे त्या भागातील प्रशासनावर थेट प्रभाव.

कोणत्या प्रभाग समितीवर येणार कोणाची सत्ता ?

1) ए बी इ – महाविकास आघाडी

2) सी डी – महायुती

3) एफ दक्षिण एफ उत्तर – महाविकास आघाडी (मनसे तटस्थ राहिली तर समसमान)

4) जी दक्षिण – महाविकास आघाडी

5) जी उत्तर – महाविकास आघाडी

6) एच पूर्व एच पश्चिम – आघाडी

7) के दक्षिण – महायुती

8) के उत्तर – महाविकास आघाडी (मनसे तटस्थ राहिली तरी महाविकास आघाडीचा अध्यक्ष)

9) के पश्चिम – महायुती

10) पी दक्षिण – महायुती

11) पी पूर्व पी पश्चिम – आघाडी (मनसे तटस्थ राहिली तरी महाविकास आघाडीचा अध्यक्ष)

12) आर दक्षिण – महायुती

13) आर मध्य आर उत्तर – महायुती

14) एम पूर्व – एम आय एम

15) एम पश्चिम – महायुती

16) एस व टी – समसमान सदस्य (मनसे तटस्थ राहिली तर महायुतीचा अध्यक्ष)

17) एल – महाविकास आघाडी

18) एन – महायुती

भाजपचे खालील नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्षदाचे अर्ज भरणार

1) ए, बी आणि ई प्रभाग समिती रोहिदास लोखंडे

2) सी आणि डी प्रभाग आकाश पुरोहित

3) के/पश्चिम प्रभाग रोहन राठोड

4) के/ उत्तर आणि के / दक्षिण प्रभाग प्रकाश मुसळे

5) पी/ दक्षिण प्रभाग श्रीकला पिल्ले

6) पी/ पूर्व आणि पी/पश्चिम प्रभाग (नाव निश्चित नाही)

7) आर/दक्षिण प्रभाग लीना देहेरकर

8) आर / उत्तर आणि आर / मध्य प्रभाग प्रकाश दरेकर

9) एम / पश्चिम प्रभाग आशा मराठे

10) एन प्रभाग अश्विनी मते

11) एस आणि टी प्रभाग साक्षी दळवी

Follow Us