ज्या भाषेने यूपी, बिहारवाल्यांचं भलं केलं नाही, त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला?; राज ठाकरेंचा संताप

आज मिरा भाईंदर येथे राज ठाकरे यांची सभा पार पडली, या सभेत बोलताना त्यांनी हिंदी भाषेच्या मुद्यावर जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं, त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

ज्या भाषेने यूपी, बिहारवाल्यांचं भलं केलं नाही, त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला?; राज ठाकरेंचा संताप
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2025 | 9:46 PM

आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

‘ 28 सप्टेंबर 2018 नीट ऐका. धुंधार साबरकांठा गुजरात 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर बिहारी लोकांना मारहाण केली. आणि 20 हजार बिहाऱ्यांना गुजरातमधून हाकलून दिलं. झाल्या का बातम्या. कुठेही बातम्या दिसणार नाही. हा माणूस त्यानंतर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याला तिकीट दिलं गेलं. तो आमदारही झाला. म्हणजे यांच्या राज्यात वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यातील लोकांना आत घेणार नाही, मारणार, आता परत गुजरातमध्ये झालं. बिहारी लोकांना बाहेर काढलं. झाल्या बातम्या? नाही झाल्या. इथे एका मिठाईवाल्याच्या कानाखाली मारल्यावर देशाची बातमी झाली, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले देशात वेगळं चित्र रंगवलं जातं. हे काय राजकारण सुरू आहे? हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो. त्याला फक्त 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावर मोदींना मी सांगितलं माझ्या पाच गोष्टी आहेत. त्यात मराठी भाषेला दर्जा द्या. दिला, पण वर्ष झालं एक रुपया मराठी भाषेसाठी आला नाही. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी ती भाषा 1400 वर्ष जुनी पाहिजे. हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अजून 1200 वर्ष आहेत. ती भाषा आमच्यावर आणि मुलांवर लादणार. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटातील नट नट्यांचं भलं झालं, दुसरं कोणाचं भलं झालं?

उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी धंद्यासाठी हे लोक महाराष्ट्रात का येतात? तुमच्याच भाषेने तुमचं भलं झालं नसेल, तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील,  गुजरातमध्ये जाऊन मार खावा लागत असेल तर हिंदीने तुमचं काय भलं केलं? कोणती भाषा घेऊन बसलो आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला? मला कारणच नाही कळलं. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.