
गेल्या काही वर्षांपासून राज्यातील खराब रस्ते हा विषय चर्चेचा ठरत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषय वक्तव्य केले आहे. ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा आहे, ते खराब झालेच पाहिजेत’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
‘रस्ते बनवणे हा धंदा आहे’
‘रस्ते बनवणे हा धंदा आहे. ते खराब झालेच पाहिजे. सर्व साटंलोटं आहे. रस्ते खराब झाले की टेंडर निघतं. खड्डे बुजवण्याचं टेंडर निघतं. कंत्राटदाराला शिक्षा होत नाही. अनेक वर्षापासून हे सुरू आहे. लोक खड्ड्यात पडून मरत आहेत. तरीही लोक ज्यांच्यामुळे घडतंय त्यांनाच मतदान करत आहेत. त्यामुळे लोक आपल्याला मतदान करत असल्याने तेही काही करत नाहीत’ असे राज ठाकरे म्हणाले.
‘त्यांचं राज्य खड्ड्यात गेलं ते दिसत नाही’
पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय असं त्यांना वाटतं. हा फक्त मुंबईचा विषय नाही. सर्व राज्यांचा विषय आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येतात त्यांना महाराष्ट्रातील खड्डे दिसतात. पण त्यांचं राज्य खड्ड्यात गेलं ते दिसत नाही. ट्रॅफिकचा लोड सर्व शहरांवर येतो. फक्त मुंबई पुण्यावर नाही.’
गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंचा दर परवडायला हरकत नसेल. महिन्याला दोन तीन हजार असेल तरी तुमची गाडी सेफ राहते. रस्त्यावर त्रास देत नाही. सर्वच गोष्टी फुकट नाही मिळत ना. समजा दादरला ८० ते ९० हजार स्क्वेअर फुटाचा भाव चालू आहे. रस्त्यावर तुमची गाडी किती स्क्वेअर फूट घेते. त्याचा भाव लावायचा का. असं होत नाही ना. त्यामुळे काही दर आकारला पाहिजे. नाही तर ट्रॅफिकची समस्या वाढेल. कशाचा पायपोस कशात नाही. ट्रॅफिकचा एकदाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे ना. रोज या शहरात माणसं आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाही. इमारती उंच होत आहे. सी लिंकला पार्किंगचा लॉट केला होता. काही प्रेशरने काढायला लावला. आमच्यासमोर पार्किंग नको असं धनदांडग्यांनी सांगितलं. तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय? माणसं येणारी थांबवली पाहिजे. बाहेरची राज्य डेव्हल्प केली पाहिजे. पण त्यातल्या त्यात हे हातात आहे ते करायला पाहिजे असे देखील राज ठाकरे म्हणाले.