
ईव्हीएम मशिन हॅक कसं होऊ शकतं, ईव्हीएम मशिनच्या मदतीनं आपलं मत आपण ज्याला केलं आहे, त्याला न होता, दुसऱ्याच व्यक्तीला कसं जाऊ शकतं याचं प्रात्यक्षिक आज मनसेच्या वतीनं सादर करण्यात आलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला, तसेच त्यांनी गडांवरील नमो टुरिझम सेंटरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील सडकून टिका केली आहे. लोक म्हणतात राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते ,पण मत मिळत नाही, तर मतं ही अशी चोरली जातात. म्हणून सांगतो मतदार यादी स्वच्छ करा, पण ते ऐकत नाही, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
लोक म्हणतात राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते ,पण मत मिळत नाही, तर मतं ही अशी चोरली जातात, म्हणून सांगतो मतदार यादी स्वच्छ करा. पण ते ऐकत नाहीत. पाच वर्ष मतदान झाले नाही, अजून एक वर्ष घेऊ नका, पण ते करत नाहीत. तुम्ही कितीही मतदान करा मॅच फिक्स आहे. मागे क्रिकेटमध्ये मॅच फिक्स झाल्यावर त्या प्लेअरला काढून टाकायचे इथे कोणाला काढत नाहीत. हे लोक असेच निवडून येतात, आणि त्यांना पाहिजे तसं वागतात, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आज एका वर्तमान पत्रात बातमी आली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो टुरिझम सेंटर काढत आहेत. मी आताच सांगतो सत्ता असो नसो वर खाली कुठेही बांधलं की फोडून टाकणार. हे खात एकनाथ शिंदेंचं आहे. मुख्यमंत्री पदासाठी एवढी चाटूगिरी सुरु आहे, शिवाजी महाराजांच्या गडावर मोदींच्या नावाने टुरिझम सेंटर? पंतप्रधान मोदी यांना देखील हे माहीत नाही, हे सगळं सत्तेतून येत आणि सत्तेतूनच मतांची चोरी होते, म्हणून 1 तारखेचा मोर्चा आहे. दिल्लीत समजलं पाहिजे काय आग पेटली आहे महाराष्ट्रमध्ये, महाराष्ट्रमध्ये असलेला राग या ठिकाणी दाखवा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.