Sanjay Raut : मुंबईत ठाकरे बंधू शतक पार करणार, राऊतांनी सांगितला थेट आकडा, म्हणाले…

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज आणि उद्धव ठाकरेंनी युती केली आहे. संजय राऊत यांनी ठाकरे गट मनसेसह शतकापार जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. फडणवीसांनी रशीद मामूंच्या प्रवेशावरून ठाकरेंवर लांगूलचालनाचा आरोप केला होता. यावर राऊतांनी भाजपवर अजित पवार-अशोक चव्हाणांच्या 'भ्रष्टचाराचे जोडे चाटल्याचा' प्रत्यारोप केला.

Sanjay Raut : मुंबईत ठाकरे बंधू शतक पार करणार, राऊतांनी सांगितला थेट आकडा, म्हणाले...
संजय राऊतांना विजयाचा विश्वास
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Dec 27, 2025 | 11:39 AM

आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज (Raj Thackrey) आणि उद्धव (Uddhav Thackrey) या दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली असून राज व उद्धव ठाकरे तब्बल 18 वर्षांनी एकत्र आलेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी युतीची घोषणा केली असून मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा करिश्मा पहायला मिळणार आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईतल्या 67 प्रभागांमध्ये दोन्ही ठाकरेंची ताकद वाढलेली पहायला मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी विजयाचा दाव करत मुंबई महापालिकेत किती जागा जिंकणार याचा थेट आकडाच सांगितला.

ठाकरेंची युती करणार शतक पार

तुम्ही 67 काय घेऊन बसलात, आम्ही याक्षणी 115 जागा जिंकत आहोत. बहुमताला जो आकडा लागतो, याक्षणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करत आहेत. 117-120 पर्यंत जागा आम्ही जिंकू हा आत्मविश्वास आम्हाला आणि आमच्या मतदारांनासुद्धा आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं. मुंबई महापालिकेत ठाकरेंचाच विजय होणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गटात रशीद मामूंचा प्रवेश पार पडला. तो वादग्रस्त ठरताना दिसत आहे. कारण चंद्रकांत खैरे यांनी त्याला विरोध केला. एवढंच नव्हे तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगूलचालन केलं जातंय अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केली होती. ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. यासंदर्भात विचारणा करण्यात आल्यावर संजय राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

एकाच माळेतले मणी 

जसे तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवारांचे, अशोक चव्हाणांचे, सर्व भ्रष्टाचाऱ्यांचे जोडे चाटतायं तसं ? हे काय आहे ? रशीद मामू वगैरे विषय सोडून द्या. निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हीसुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचाऱ्यांचे जोडे चाटताच आहात ना. ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजित पवार, अशोक चव्हाण यांचे जोडे कोण चाटतंय ? कशाकरता चाटत आहेत मग ? असा सवाल उपस्थित करत हे सगळे एकाच माळेतले मणि आहेत, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.