आषाढीच्या दिवशीच जाहीर करा अन्यथा…शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; मोठा लढा उभारणार?

मी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारा माणूस आहे. हाय कोर्टाचा निर्णय आहे की खोटी झाडे लावल्याचे दाखवले तर व्याजसकट पैसे वसूल करा. भाजपची एवढी देवावर भक्ती असती तर या भामट्यांनी राम मंदिरावर डल्ला मारला नसता, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

आषाढीच्या दिवशीच जाहीर करा अन्यथा...शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; मोठा लढा उभारणार?
devendra fadnavis and raju shetty
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2026 | 6:08 PM

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाला राज्यात कडाडून विरोध होत आहेत. या महामार्गाला विरोध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते एकत्र आले आहेत. आपला हा विरोध दर्शवण्यासाठी आज (28 जून) सोलापूर जिल्ह्यातील करकंब शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला काँग्रेसचे नेते सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. राजू शेट्टी यांनी काहीही झालं तरी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग मागे घेतला आहे असे जाहीर करावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. तसेच ही घोषणा न केल्यास मोठे आंंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजेचे ऑडिट करावे

या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. गेली 12 वर्षे सत्तेत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी किती दिवे लावले. फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजेचे ऑडिट करावे, त्यातून या सरकारची कामगिरी समजेल. सध्याच्या नागपूर – रत्नागिरी रस्ता 8 पदरी होईल इतकी जमीन सरकारकडे आहे, असे म्हणत त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला. तसेच रस्ता करण्यापेक्षा सरकारने पाण्याचे प्रकल्प करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

राम मंदिर लुटणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोझर…

मी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारा माणूस आहे. हाय कोर्टाचा निर्णय आहे की खोटी झाडे लावल्याचे दाखवले तर व्याजसकट पैसे वसूल करा. भाजपची एवढी देवावर भक्ती असती तर या भामट्यांनी राम मंदिरावर डल्ला मारला नसता. योगी आदित्यनाथ हा संत माणूस आहे. मग राम मंदिर लुटणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोझर का फिरला नाही, असा जळजळीत सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

क्तीपीठाच्या कचाट्यातून सोडवले असे जाहीर करा

पुढे बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मराठी माणूस म्हणून तुम्ही पंतप्रधान झाला तर आम्हाला आनंद आहे. पण कर्तृत्वाने पंतप्रधान व्हा. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा केल्यावर शेतकऱ्यांना शक्तीपीठाच्या कचाट्यातून सोडवले असे जाहीर करा. अन्यथा वेगळ्या पद्धतीने तुमचे स्वागत करू, असा थेट इशाराच राजू शेट्टी यांनी दिला. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us