
नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात असलेल्या रुद्रायणी देवीचा गड भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला आहे. अकोला शहरापासून अवघ्या ५० किलोमीटरवर असलेला हा गड आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे नाशिकच्या सप्तशृंगी गडासारखा अनुभव देतो. या प्राचीन देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना तब्बल ३६० पायऱ्या चढाव्या लागत आहे.
चिंचोली गावानजीक एका उंच पहाडावर रुद्रायणी देवीचा निवास आहे. हा परिसर सभोवतालच्या निसर्गाने नटलेला असल्याने, गडावरून दूरदूरपर्यंतचे निसर्गरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी मिळते. निसर्गाची ही सुंदर छटा भाविकांना वेगळी शांती आणि ऊर्जा देते. स्थानिक परंपरेनुसार, हे मंदिर अतिशय पुरातन आहे. देवीची मूर्तीसुद्धा दगडी आणि प्राचीन आहे. तिच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून हजारो भक्त वर्षातून अनेकवेळा येत असतात. या देवीला साकडं घातल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मंदिराच्या इतिहासाबाबत एक अनोखी आख्यायिका सांगितली जाते. त्रेतायुगात प्रभू राम आणि सीता या ठिकाणी दोन वेळा येऊन गेल्याचे मानले जाते. यामुळे या स्थळाला एक वेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते. देवीच्या दर्शनासाठी केवळ अकोला जिल्ह्यांतूनच नाही, तर दूरदूरच्या भागांतून भाविकांची अलोट गर्दी होते. या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना भक्तीभावाने ३६० पायऱ्यांची चढाई करावी लागते.
पायऱ्या चढून गडावर पोहोचल्यावर होणारे रुद्रायणी मातेचे दर्शन, हा अनुभव भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि समाधानकारक असतो. पायथ्याशी नऊ दिवस मोठी यात्रा भरते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण तयार होते. भक्ती, निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम म्हणून या गडाला ओळखले जाते. अकोल्यातील रुद्रायनी मातेचा गड हा या नवरात्रोत्सवातील मुख्य श्रद्धास्थान मानला जातो.
दरम्यान अकोला जिल्ह्याच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नवरात्रोत्सवाचे स्थान खूप मोठे आहे. शहरातील विविध मंदिरे आणि ग्रामीण भागातील शक्तीपीठांवर नऊ दिवस उत्साहाचे वातावरण असते. या काळात केवळ रुद्रायणी मातेचा गडच नव्हे, तर शहरातही मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, रुद्रायणी मातेच्या गडावर असलेले हे अनोखे ऐतिहासिक आणि नैसर्गिक पावित्र्य आहे. हा गड अकोला जिल्ह्याच्या नवरात्रोत्सवाचे एक मुख्य आणि अविभाज्य प्रतीक बनला आहे. या काळात अकोला जिल्ह्यातील भक्तांची श्रद्धा आणि उत्साह खऱ्या अर्थाने शिगेला पोहोचलेला दिसतो.