हैदराबाद गॅझेटबाबत रामदास आठवलेंचं मोठं भाकीत, स्पष्टच बोलले…, मराठा आरक्षणासंदर्भात मोठं वक्तव्य

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर अखेर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

हैदराबाद गॅझेटबाबत रामदास आठवलेंचं मोठं भाकीत, स्पष्टच बोलले..., मराठा आरक्षणासंदर्भात मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2025 | 7:55 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली होती. लाखोच्या संख्येनं मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत एकवटला,  या आंदोलनाला मोठं यश मिळालं, जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील काढण्यात आला.

मात्र दुसरीकडे सरकारने घेतलेल्या या निर्णयाला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे. मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण द्या, ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा समाजाची आहे, या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

ओबीसी समाजाला आधीच आरक्षण कमी मिळालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको. मराठा समाजाला यापूर्वीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू केलं तरी सरसकट मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा असतो त्यात राज ठाकरेंना कदाचित बोलावल्या जाऊ शकतं.  पण जरी दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलाही फरक पडणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईची सत्ता मिळणं अवघड आहे. मुंबई महापालिका महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही यावेळी आठवले यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान मराठा आरक्षणावरून आता फडणवीस यांचे फोटो लागल्याचं पहायला मिळत आहे, यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं. ब्राह्मण असतानाही त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सत्तर वर्षात अनेक मराठा मुख्यमंत्री राहिले, मात्र मराठा मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला नव्हता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय घेतल्यामुळे त्यांचे पोस्टर लागलेच पाहिजेत, असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.