
गुरुवारी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मोठा दावा केला आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असं खळबळजनक विधान कदम यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून राजकारण तापलं असतानाच आता पुन्हा एकदा कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
मी आज उद्धव ठाकरेंना आव्हान देत आहे, हिंमत असेल तर तुम्ही बोला, तुम्हाला मी उत्तर देईल. अंबादास दानवे सारख्यांना मी निवडून आणलं, बाळासाहेब ठाकरेंचं मी रोज दर्शन घेतो. उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर समोर यावं, आणि असं घडलं नाही सांगावं. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची ठाकरे यांची सवयच आहे. दोन दिवस बाळासाहेबांच्या मृतदेहाचा छळ उद्धव ठाकरेंनी केला. माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा. मी बोललो होतो, बाळासाहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे दैवत आहेत, तेव्हा ठाकरे म्हणाले मी हाताचे ठसे घेऊन ठेवलेत असा हल्लाबोल यावेळी कदम यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांचं निधन झालं हे मी लोकांसमोर डिक्लेअर केलं, मी मर्द माणूस आहे, घाबरणारा नाही. काल मी ओघाओघामध्ये बोलून गेलो. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्टेटमेंट देतात, तसे ते नाहीयेत. उद्धव ठाकरे वाघ नाहीत तर लांडगा आहेत. अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, ज्या ज्यावेळी तोंड उघडणार, त्या- त्यावेळी मातोश्रीवर हादरा बसेल. माझ्य़ा नादीला लागू नका, असा इशाराही यावेळी कदम यांनी दिला आहे.
मी निष्ठेनं शिवसेनेसोबत दिवस काढले आहेत, बाळासाहेबांसोबत असं घडलं याचं मला वाईट वाटतं. त्यावेळी जे डॉक्टर होते त्यांना विचारा, निधन कधी झालं. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, बदलणार नाही. बाळासाहेब तुमच्या बाबतीत माझ्याकडे काय बोलले हे माझ्या मनात आहे. मला बोलायला लावू नका, बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही? असा प्रश्नही यावेळी कदम यांनी उपस्थित केला आहे.