बाळासाहेबांच्या हाताचे ठसे, स्विस बँकेत अकाउंट…, परबांच्या आरोपांवर रामदास कदम यांचं एका वाक्यात उत्तर

रामदास कदम यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच योगेश कदम यांनी सचिन घायवळ याला दिलेल्या शस्त्र परवान्याबाबत देखील त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

बाळासाहेबांच्या हाताचे ठसे, स्विस बँकेत अकाउंट..., परबांच्या आरोपांवर रामदास कदम यांचं एका वाक्यात उत्तर
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 09, 2025 | 4:05 PM

पुणे गोळीबार प्रकरणात लंडनला पळून गेलेला गुंड निलेश घायवळ याचा भाऊ असलेल्या सचिन घायवळ याला देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यावरून राज्यात सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. सचिन घायवळ याला गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर शस्त्र परवाना मिळाल्याचं समोर आलं आहे. यावरून विरोधकांनी योगेश कदम यांना कोंडीत पकडलं आहे, शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका सुरू आहे, त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास  कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे, सोबतच त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

बाळासाहेब आमचे दैवत होते, आजही आहेत. मला उद्धवजींनी सांगितलं होतं, हाताचे ठसे घेतले. जर आमचं दैवत म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर त्यात वाईट काय आहे? यांना असं का वाटतं, स्वीच बँकेत खात आहे, म्हणून मी बोललो? बाळासाहेबांबाबत असले घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापीही येणार नाहीत. मी संशय व्यक्त केला होता, माझा विषय संपला. बाळासाहेबांची बदनामी होईल, असं कोणतंही वक्तव्य माझ्याकडून होणार नाही. ते आमचे दैवत आहेत, असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यावरून देखील परब यांनी योगेश कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्याला देखील कदम यांनी यावेळी उत्तर दिलं आहे. गृह राज्यमंत्र्याला अधिकार असतात, जर एखाद्या व्यक्तीवर एकही गुन्हा नाही, त्याच्यावर कोर्टात कोणतीही केस नाही, तर गृहराज्यमंत्री तसा निर्णय घेऊ शकतात. तुम्हाला विचारून निर्णय घ्यायचे का? असा सवाल यांनी कदम यांनी केला. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला मुद्दामहून सांगतोय, मला जास्त खोलात जायचं नाही. मी योगेश कदम यांना विचारलं, त्यांनी लायन्सबाबत जो निर्णय घेतला आहे, तो एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेत, विधिमंडळांत मंत्र्यांना देखील आदेश देणाऱ्या अशा व्यक्तीनं त्यांना सांगितलं आहे. तो व्यक्ती देखील न्यायाधीशच आहे, त्यांनी योगेश कदम यांना सांगितलं, आणि म्हणून योगेश कदम यांनी हा निर्णय घेतला आहे. योगेश कदम यांनी त्या व्यक्तीचं नाव मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.