भजन करता करताच प्रबोधनकार रामधन महाराज कोसळले… जागीच मृत्यू… काळजात एकच धस्स… शेवटच्या शब्दांनी सर्वच हेलावले…
जालना जिल्ह्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. भर कार्यक्रमात भजनकार रामधन महाराज राठोड यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे.

Ramdhan Maharaj Rathod : जालना जिल्ह्यातून अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बंजारा समाजाचे ज्येष्ठ प्रबोधनकार तथा प्रसिद्ध भजनकार रामधन महाराज राठोड यांचे भजन कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. भजनात तल्लीन होऊन समाजप्रबोधनाचे विचार मांडत असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच ते मंचावर कोसळले. ही संपूर्ण घटना तेथील एका तरुणाने मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतूर तालुक्यातील सुरुमगाव तांडा येथे बंजारा समाजाच्या वतीने रामधन महाराज राठोड यांच्या भजन आणि समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील तसेच विविध भागांतील बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामधन महाराज आपल्या खास शैलीत भजन सादर करत समाजातील ऐक्य, संस्कार आणि सामाजिक परिवर्तन याबाबत मार्गदर्शन करत होते.
भजनाच्या कार्यक्रमात वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले असताना अचानक रामधन महाराज यांना चक्कर आली. काही क्षणांतच ते मंचावर कोसळल्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
विविध स्तरांतून हळहळ व्यक्त
भजनाच्या सुरांमध्ये आणि समाजप्रबोधनाच्या कार्यात आयुष्य घालवणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा अंतही भजन करतानाच झाल्याने उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. रामधन महाराज यांच्या निधनाची बातमी समजताच बंजारा समाजात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामधन महाराज राठोड यांनी अनेक वर्षे भजन, कीर्तन आणि समाजजागृतीच्या माध्यमातून बंजारा समाजात प्रबोधनाचे कार्य केले. सामाजिक एकोपा, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि संस्कृती जपण्याचा संदेश त्यांनी आपल्या भजनातून सातत्याने दिला. त्यांच्या कार्यक्रमांना नेहमीच मोठी गर्दी होत असे आणि समाजातील युवकांवर त्यांचा विशेष प्रभाव होता.
त्यांच्या निधनामुळे बंजारा समाजाने एक प्रभावी वक्ते, भजनकार आणि समाजप्रबोधनकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.