
Ramraje Nimbalkar : साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणानंतर भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे राज्यभरात चर्चेत आले आहेत. या आत्महत्या प्रकरणाशी निंबाळकर यांचे नाव जोडले जात आहे. याच पार्श्वभूमीवर 3 नोव्हेंबर रोजी निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले. तसेच माझ्यावक करण्यात आलेल्या आरोपांत रामराजे निंबाळकर हेच मास्टरमाईंड आहेत, असा गंभीर आरोप केला. आता रणजितसिंह निंबाळकर यांच्या याच आरोपांची रामराजे निंबाळकर यांनी चिरफाड केली आहे. सोबतच रणजितसिंह यांच्यावर घालण्यात आलेल्या दुग्धाभिषेकावरूनही रामराजे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. रणजितसिंह यांनी फलटणच्या सामान्य लोकांना फार त्रास दिला आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध करणार, असे म्हणत रामराजे यांनी दंड थोपटले आहेत.
रणजितसिंह निंबाळकरांना जनाधार नाही
रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी रामराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना रणजितसिंह निंबाळकर यांना जनाधार नाही. त्यांनी काल इकडून-तिकडून माणसं आणले होते. आजकाल माणसं आणण्याचं शास्त्र झालं आहे. काल त्यांचा तथाकथित इव्हेंट झाला. हा इव्हेंट दाखवला जात होता, तेव्हा त्याच्या खालच्या कमेंट वाचल्या तर लोकांचे मत काय आहे ते समजेल. त्यांचा इव्हेंट त्यांना लखलाभ, अशी बोचरी टीका रामराजे निंबाळकर यांनी केली.
रणजितसिंह निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्या समर्थकांनी त्यांचा दुग्धाभिषेक केला. त्यावरही रामराजे निंबाळकर यांनी सडकून टीका केली. दूध कोणाला घालतात. माझ्या माहितीप्रमाणे दूध शंकराच्या पिंडीवर घालतात. दूध देवावर घालतात, असे म्हणत रणजितसिंह निंबाळकर देव आहेत का? असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी केला. तसेच रणजितसिंह निंबाळकर हे जर स्वत:ला देव समजत असतील तर फलटण नगरपालिकेचं पाणी तरी वापरू नका, असा सल्लाही रामराजे यांनी दिला.
हा ग्रहस्थ म्हटलं तर नात्यातील आहे आणि म्हटलं तर नात्यातील नाही. कारण निंबाळकर घराण्याची ही संस्कृती नाही. खंडणी, प्रशासकीय दबाव याच्या मदतीने रणजितसिंह निंबाळकर यांनी कारस्थानं रचली. सर्वसामान्य लोकांना त्यांनी हैराण करून सोडलं आहे. याला मी शेवटपर्यंत विरोध करणार आहे, असे दंडच रामराजे निंबाळकर यांनी थोपटले आहेत. सोबतच यात त्यांच्या भाजपा पक्षाचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत त्यांनी हा लढा फक्त रणजितसिंह निंबाळकर आणि माझ्यात असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.