माझी नार्को टेस्ट करा, रणजितसिंह निंबाळकरांचे आव्हान, दुग्धाभिषेक होताच ढसाढसा रडले!
सातारा डॉक्टर महिलेप्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत.

RanjitSinh Nimbalkar : साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर चांगलेच वादात सापडले आहेत. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाशी त्यांचे नाव जोडले जात आहेत. हे आत्महत्या प्रकरण लावून धरत ठाकरे गाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसांत वेगवेगळे पुरावे सादर केले आहेत. दरम्यान, आता याच आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी रणजितंसिंह नाईक निंबाळकर पुढे आले आहेत. त्यांनी माझ्यासकट सर्वांचीच लाय डिटेक्टर टेस्ट करा, असे खुले आव्हान देत डॉक्टर महिला प्रकरणाशी माझा संबंध नाही, असा दावा केला आहे.
सुषमा अंधारे यांची मागितली माफी
रणजितसिंह निंबाळकर यांनी 3 नोव्हेंबर रोजी फलटण येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी अनेक व्हिडीओ, फोटो आणि संभाषणं दाखवली. सोबतच पत्रकार परिषदेच्या अगोदर त्यांनी एक मिनिट उभे राहून मृत डॉक्टर महिलेला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर बोलताना निंबाळकर यांनी सुषमा अंधारे यांची माफी मागितली. अंधारे यांना कोणीही काहीही वाईट बोलले असेल तर मी माफी मागतो. मी गेल्या एका वर्षांपासून एकच घोषणा करतोय. आपल्याला बदला घ्यायचा नाही. आपल्याला बदलाव घडवून आणायचा आहे, असे यावेळी रणजितसिंह निंबाळकर म्हणाले.
रामराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप
तसेच, डॉक्टर महिला प्रकरण तसेच माझ्यावरच्या इतर सर्व आरोपांचे मास्टरमाईंड हे रामराजे निंबाळकर हेच आहेत, असाही खळबळजनक दावा त्यांनी केला. पुढे बोलताना ‘शेर को धमका सकते है डरा नही सकते’ असे म्हणत रामराजे निंबाळकरांना आव्हानच दिले. तुमच्या कर्तृताचा पाढा वाचायचं तर वेगळी सभा घ्यावी लागेल, अशी बोचरी टीकाही राणजितसिंह निंबाळकर यांनी केली.
रणजितसिंह यांच्यावर दुग्धाभिषेक, ढसाढसा रडले
दरम्यान, या पत्रकार परिषदेदरम्यान, रणजितसिंह निंबाळकर यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर दुग्धाभिषेक केला. यावेळी निंबाळकर यांना अश्रू अनावर झाले. ते ढसाढसा रडले. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. निंबाळकर यांनी डॉक्टर महिला प्रकरणातील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे आता सुषमा अंधारे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
