
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. परंतु या दोन्ही निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर पक्षाकडून कारवाई सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी सोलापुरात कार्यक्रम होत आहे. सोलापूरवरुन गोवा विमानसेवा सुरु होणार आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत सोलापूरमधील बडे नेते आणि भाजप विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव वगळण्यात आले आहे.
सोलापूर गोवा विमानसेवेच्या निमंत्रण पत्रिकेतून सोलापूर भाजपने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव वगळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी सोलापूर गोवा विमान सेवेचा शुभारंभ होणार आहे. यासाठी पक्षाने प्रकाशित केलेल्या कार्यक्रम पत्रिकेतून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव तसेच फोटो देखील नाही. माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार आणि माळशिरस विधानसभा मतदार संघातील पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षाकडे केली होती.
भाजपने पक्षविरोधी काम केल्याचा आरोपावरुन रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतरही मोहिते पाटील पक्षाच्या विविध बैठकांना हजेरी लावताना दिसले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून भाजपने मोहिते पाटलांचे नाव आणि फोटो वगळले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे आमदारांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत. परंतु भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नाही. त्यामुळे भाजपकडून मोहिते पाटील यांच्यावर कारवाई सुरु झाल्याचे संकेत मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना माध्यमांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न माध्यमांनी विचारला होता.