
निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी मी खचलेलो नाही. मी आमदार नाही, पण एका नाही तर दोन-दोन आमदारांचा बाप आहे. सरकार माझं आहे आणि जालन्याच्या विकासासाठी जितका निधी लागेल, तितका खेचून आणण्याची धमक माझ्यात आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर बैठकीत रावसाहेब दानवे बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत राजकीय विरोधकांचा समाचार घेतला.
यावेळी रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालावर भाष्य केले. मी पडल्यानंतर माझं तोंड वाकडं झालं नाही किंवा मी कोणावर आरोप करत बसलो नाही. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मी जनतेत गेलो आणि संपूर्ण मराठवाड्याचा दौरा केला. मी जरी आमदार नसलो तरी एका सामान्य घरातील कार्यकर्ता आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
यावेळी खासदार कल्याण काळे यांचा उल्लेख करत त्यांनी उपरोधिक टोला लगावला, “मला पाडलं तर पाडलं, कल्याण निवडून आला. आता करून घ्या कल्याण, तुमचं सध्या बरं चाललंय ना? गेल्या दोन वर्षात जालन्यासाठी दोन लाख रुपये तरी आणले का? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी विचारला. या विधानावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही त्यांनी काहीच आणले नाही म्हणूनच मी तुमच्याकडे आलो, असे म्हटले. ज्यामुळे बैठकीत एकच हशा पिकला.
रावसाहेब दानवे यांनी केवळ टीकाच केली नाही, तर विरोधकांना थेट मैदानात येण्याचे आवाहन दिले. ते म्हणाले, आम्ही स्वबळावर महानगरपालिका लढण्याची हिंमत केली आहे. कार्यकर्त्यांनी आता गप्प बसू नये. आपल्या वॉर्डातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलवा आणि समोरासमोर विकासाचा हिशोब मागा. तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं, हे जनतेसमोर येऊ द्या. जो या स्पर्धेत हरेल, त्याने भर चौकात कान धरून ५ उठबश्या मारायच्या, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
“आम्ही ओरडून सांगतोय, आता तुम्हीही तोंड उघडा. शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी संवाद साधा, त्यांना चहा प्यायला बोलवा आणि जालना महानगरपालिका भाजपच्या ताब्यात का असायला हवी, हे पटवून द्या. जालन्याचा कायापालट करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,” असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले.