
शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे लवकरच ठाकरे गटाला रामराम करणार असल्याचे बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राजन साळवी हे लवकरच शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या 14 फेब्रुवारीला राजन साळवी हे शिंदे गटात प्रवेश करतील, असे बोललं जात आहे. आता यावर रत्नागिरीतील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
रत्नागिरीतील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजन साळवी यांना घरचा आहेर देत मोठमोठे गौप्यस्फोट केले. विधानसभेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच राजन साळवी यांनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली, असा दावा विलास चाळके यांनी केला.
“राजन साळवी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या पराभवाचे खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीवरही त्यांनी हेच केलं. विधानसभा निवडणुकांचा निकाल २३ तारखेला लागला. त्यानंतर २५ तारखेपासून ते भाजपमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत. याचाच अर्थ लोकसभा निवडणुकीत यांनी काय केलं असेल यांचं उत्तर आपल्याला सापडतंय असं वाटतं. आमच्यावर जे आरोप केलेत ते आरोप त्यांनी सिद्ध करावेत”, असे विलास चाळके म्हणाले.
“किरण सामंत आणि आमचा व्यवसाय सेम आहेत. पण त्यांना कोणतीही राजकीय मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याअर्थी राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याचा, शिंदे गटात जाण्याचे प्रयत्न करतात, यामुळे मला असं वाटतं की त्यांना बाहेर पडण्यासाठी फक्त निमित्त हवं होतं. पराभवाचं खापर कोणावर तरी फोडायचं होतं. यामुळे ते पराभवाचं खापर माझ्यावर आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ते प्रवेश करतील की नाही यावरुन सर्व गोष्टी स्पष्ट होतील”, असेही विलास चाळकेंनी म्हटले.
“विधानसभेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजन साळवी यांनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली. ज्यांना गद्दार बोलले, त्यांच्यासोबत राजन साळवी जातील असं वाटत नाही. राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. राजन साळवी यांना पाच वेळा एबी फॉर्म दिला आणि तीन वेळा आमदार म्हणून पक्षाने निवडून आणलं. राजन साळवी कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्यासोबत कोणीही कार्यकर्ता जाणार नाही”, असा विश्वास रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी व्यक्त केला. तसेच भाजप आणि त्यानंतर शिवसेना अशा राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांमुळे राजन साळवी यांची फरफट होत असल्याचा दावा विलास चाळके यांनी केला आहे.