
पुणे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. पुणे महापालिका नि़वडणुकांची धामधूम सुरु असतानाच पुण्यात भ्रष्टाचाराच्या पैशावरून आणि नैतिकतेच्या मुद्द्यावरून मोठे राजकीय युद्ध पेटले आहे. त्यातच शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी महायुतीवर विशेषतः भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांवर पैसा, सत्ता आणि डान्सबार या त्रिसूत्रीवरून गंभीर आरोप केले आहेत. पुणेकरांच्या घामाचा पैसा महापालिकेतून लुटला गेला आणि तो आता डान्सबारमध्ये बारबालांवर उधळला जात आहे, असा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान करण्याचा दावा केला. मात्र, त्यांचेच उमेदवार डान्सबारमध्ये महिलांवर पैसे उधळताना दिसत आहेत. हा कसला महिलांचा सन्मान? डान्सबारमध्ये पैसे उधळून तुम्ही तिथल्या महिलांना लखपती दीदी बनवत आहात का? असा खोचक सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे संस्कृतीच्या गप्पा मारतात. मग त्यांच्याच पक्षात ही अशी ‘पिलावळ’ कशी वाढतेय? या भ्रष्ट आणि चारित्र्यहीन लोकांमुळे पक्ष बदनाम होत आहे, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळी आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे.
खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत.
प्रभाग… pic.twitter.com/Mxu8PkYTHs— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) January 13, 2026
संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील आता गप्प का? त्यांनी स्पष्ट करावे की भाजपमध्ये चारित्र्यहीन लोकांसाठी किती जागांचा कोटा आरक्षित आहे. हे लोक पुणेकरांशी गोड बोलतात, पण आतून पालिकेची तिजोरी उकळण्याचे काम करत आहेत. यांचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे, असा सवाल धंगेकर यांनी केला आहे.
पुण्याच्या राजकीय संस्कृतीला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड संपवण्यासाठी पुणेकरांनी आता जागरूक होण्याची गरज आहे. पुणेकर दोन डोळ्यांनी हे सर्व पाहत आहेतच, पण आता त्यांनी मतदानाच्या माध्यमातून आपला तिसरा डोळा उघडला पाहिजे. ही पिलावळ जर अशीच वाढत गेली, तर पुण्याच्या संस्कृतीला मोठी बाधा येईल. त्यामुळे स्वाभिमानाचे आणि भ्रष्टाचारमुक्त पुण्यासाठी मतदान करा,” असे आवाहन धंगेकरांनी जनतेला केले आहे.
शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत पुण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स या दाव्याची खिल्ली उडवली होती रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमधील व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबतच हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो, असा आरोपही केला आहे. या आरोपांमुळे पुण्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, आता भाजप आणि शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.