
Republic Day 2026 Chief Guest Selection Process: देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी यंदा चीफ गेस्ट कोण असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. युरोपियन युनियनचे (EU) वरिष्ठ नेते यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यामध्ये युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन हे दोघेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निर्णयाकडे भारत–युरोपियन युनियनमधील धोरणात्मक, राजकीय आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
25 ते 27 जानेवारी 2026 दरम्यान भारत दौरा
अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयेन हे 25 ते 27 जानेवारी 2026 दरम्यान भारताच्या तीन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर असतील. या काळात ते: भारत–EU शिखर परिषदेत सहभागी होतील. प्रजासत्ताक दिनाशी संबंधित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. भारतीय नेतृत्वासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा करतील. भारतामध्ये प्रजासत्ताक दिनासाठी परदेशी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा 1950 पासून सुरू झाली. देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाचा चीफ गेस्ट होणे हे कोणत्याही देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नेत्यासाठी सर्वोच्च सन्मान मानले जाते.
चीफ गेस्टची निवड कशी होते?
प्रजासत्ताक दिनासाठी चीफ गेस्ट निवडण्याची प्रक्रिया मुख्य कार्यक्रमाच्या सुमारे सहा महिने आधी सुरू होते. ही निवड अत्यंत विचारपूर्वक केली जाते. भारताचे माजी राजदूत मानबीर सिंग यांच्या मते, चीफ गेस्ट निवडताना अनेक महत्त्वाच्या बाबी तपासल्या जातात. ज्यामध्ये संबंधित देश किंवा संघटनेचे भारताशी असलेले राजनैतिक संबंध, राजकीय, लष्करी आणि आर्थिक सहकार्य. जागतिक स्तरावर त्या देशाचे किंवा नेत्याचे महत्त्व. भारताच्या परराष्ट्र धोरणातील प्राधान्यक्रम या सर्व बाबींचा अभ्यास करून परराष्ट्र मंत्रालय अंतिम निर्णय घेते आणि चीफ गेस्टच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातो.
चीफ गेस्टला मिळणारा मान-सन्मान
प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण सोहळ्यात चीफ गेस्ट विशेष मानाचे स्थान भूषवतात. त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाते. राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित केले जाते. तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींकडून विशेष स्वागत समारंभ आयोजित केला जातो.
चीफ गेस्ट हे राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजघाटावर जातात. याशिवाय, पंतप्रधान त्यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतात. या कार्यक्रमाला परराष्ट्र मंत्री, उपराष्ट्रपती, वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहतात.