
आपले स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर घेण्याचे स्वप्न उराशी बांधलेल्या एका रेल्वेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला एका विकासकाने अक्षरशः रस्त्यावर आणले आहे. त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असलेली तब्बल २३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, ही फसवणूक २०१६ मध्ये झाली असून, तब्बल १० वर्षांनंतर पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे डोंबिवली परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचापाडा भागात राहणारे काबू निरभवणे हे रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी आपल्या कमाईतील साठवलेली पुंजी वापरून कुटुंबासाठी एक बीएचके घर घेण्याचा निर्णय घेतला. या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी २०१६ मध्ये विकासक प्रसाद जनार्दन पाटोळे यांच्याशी संपर्क साधला. पाटोळे यांनी त्यांना २२ लाख रुपयांत एक सदनिका देण्याचे आश्वासन दिले. निरभवणे कुटुंबाने विकासकाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून वेळोवेळी त्याला पैसे दिले. यावेळी निरभवणे कुटुंबाने एकूण १८ लाख रुपयांची रक्कम विकासकाला दिली.
इतकंच नाही, तर पैशाच्या व्यवहाराबरोबरच पाटोळे यांनी पालिका अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगत निरभवणे यांच्याकडून आणखी २ लाख रुपये उकळले. मात्र, एवढे पैसे देऊनही निरभवणे यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले नाही. उलट, ज्या प्रकल्पात घर देण्याचे आश्वासन दिले होते, त्यावर पालिकेने कारवाई करून तो प्रकल्प बंद पाडला. यामुळे निरभवणे कुटुंब हादरले. आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर निरभवणे यांनी पाटोळे यांच्याकडे घराचा किंवा दिलेल्या पैशाचा तगादा लावला.
त्यावर पाटोळे यांनी दुसऱ्या प्रकल्पात घर देतो असे सांगत त्यांची बोळवण केली. त्यांनी सुनीलनगर, श्री सद्गुरू छाया, एकदंत हाइट्स यांसारख्या वेगवेगळ्या प्रकल्पांची आमिषे दाखवली, पण कुठेही घर मिळाले नाही. शेवटी, जेव्हा निरभवणे यांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा पाटोळे यांनी त्यांना चेक दिले. पण, ते चेक बँकेत क्लिअरच झाले नाहीत. यामुळे सेवानिवृत्त निरभवणे दांपत्याची २३ लाख रुपयांची पुंजी पूर्णपणे बुडाली.
या सततच्या फसवणुकीला कंटाळून आणि आपली आयुष्यभराची कमाई गमावल्याने हवालदिल झालेल्या मीना निरभवणे यांनी अखेर विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद पाटोळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे, सेवानिवृत्तीची पुंजीच बुडवली तर साधा माणूस घर कधी घेणार?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घर खरेदी करताना अधिक सतर्क आणि सावध राहणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.