
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात होऊन महिना होत आला आहे. या प्रकरणी सीआयडी आणि डीजीसीएकडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, इतक्या दिवसानंतरही या अपघाताचा साधा प्राथमिक अहवाल आलेला नाही. अजितदादांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. अजितदादांचा अपघात झाला नसून घातपात झाला आहे, असं रोहित पवार सातत्याने सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी अत्यंत बारकाईने मुद्दे मांडले आहेत. काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे मिळाली नाहीत. तसेच पोलिसांनीही अजितदादांच्या अपघाताचा एफआयआर दाखल करून घेतलेला नाही. त्यामुळे रोहित पवार उद्विग्न झाले आहेत. अशातच आज पत्रकार परिषद संपल्यानंतर अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून त्यांचा जयघोष करण्यात आला. त्यामुळे रोहित पवार यांचा पाराच चढला. त्यांनी सर्वांसमोरच या अतिउत्साही कार्यकर्त्याला झापलं. चल निघ इथून, अशा शब्दातच त्यांनी कार्यकर्त्याला सुनावलं.
मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार हे अजितदादांच्या अपघाताचा एफआयआर नोंदवण्यासाठी आले होते. पण त्यांचा एफआयआर घेण्यात आला नाही. त्यामुळे रोहित पवार हे आज बारामतीच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी आले. यावेळी रोहित पार यांचे वडील आणि अजितदादांचे चुलत बंधू राजेंद्र पवार आणि अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवारही हजर होते. या शिवाय 100 हून अधिक वकील स्वत:हून पोलीस ठाण्यात आले होते. पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा एफआयआर नोंदवून घेतला नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर कुणाचा तरी दबाव असल्याचा दावा केला. तसेच पोलिसांनी एक ते दीड तास मागितला असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं.
पत्रकार परिषद संपताना काय घडलं?
ही पत्रकार परिषद तब्बल अर्धा तास चालली. रोहित पवार आधी मराठीत बोलले. त्यानंतर त्यांनी सर्व माहिती हिंदीत दिली. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही त्यांनी उद्वेगाने भाष्य केलं. आम्हाला हे विलिनीकरण नकोय. दादांची भावनिक इच्छा होती. आता दादा नाही. असलं विलिनीकरण काय कामाचं? असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी अजितदादा आणि शरद पवार यांच्यातील संवादाची आठवण करून दिली. त्यावेळी रोहित पवार गहिवरले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद संपवली.
पत्रकार परिषद संपल्यानंतर रोहित पवार आणि युगेंद्र पवार निघायला उठले. इतक्यात एका अतिउत्साही कार्यकर्त्याने रोहित दादा तुम आगे बढो… अशी घोषणा दिली. ही घोषणा ऐकून रोहित पवार चांगलेच भडकले. त्यामुळे त्यांनी संतापून चढ्या आवाजातच ए… ए.. काय येडा आहे का तू? चल निघ इथून, असं म्हटले. रोहित पवार संतापल्याने काहीवेळ शांतता पसरली. त्यानंतर रोहित पवार पुन्हा बोलले. फक्त एकच दादा अजितदादा. बस्स, असं त्यांनी जोरात सांगितलं. त्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांच्या घोषणा आल्या. एकच दादा, अजितदादा, एकच दादा अजितदादा… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.