कोंबड्याला पिल्लांचा लागलाय लळा, जगावेगळ्या लाल्या कोंबड्याला पहायला गर्दी, Video

मुलांना वाढवण्याची आणि त्यांच्या पोषणाची जबाबदारी आई घेत असते. प्राण्यातही ही जबाबदारी मादीवर असते. परंतू एका कोंबड्याने मात्र कोंबडीच्या पिल्लांना आधार दिला आहे.

कोंबड्याला पिल्लांचा लागलाय लळा, जगावेगळ्या लाल्या कोंबड्याला पहायला गर्दी, Video
Updated on: Oct 01, 2025 | 4:43 PM

मनुष्याप्रमाणे प्राण्यांमध्येही पिल्लांची जबाबदारी आईच्याच वाटाल्या आल्याचे दिसत असते. पिल्लांना चोचीतून अन्न भरवणे, अन्न शोधणे अशी कामे प्राण्यांमधील मादीच करताना दिसत असते. परंतू पु्ण्याच्या भोर तालुक्यातील वाठार हीमा गावातील एका कोंबड्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या कोंबड्याने कोंबडीच्या मृत्यूनंतर स्वत:च्या पंखाखाली पिल्लांच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतल्याने या लाल्या कोंबड्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

भोर तालुक्यातील वाठार हिमा गावाच्या अर्जुन खाटपे या शेतकऱ्याने एका कोंबडीला पाळले होते. तिने दहा-बारा अंड्यांना उबवून पिल्लांना जन्म घातला. मात्र एकदा पिल्लांसह कोंबडी अंगणात चरत असताना एका भटक्या कूत्र्याने या कोंबडीला पकडून तिला ठार केले. कोंबडी गेल्यानंतर या पिल्लांना आता कोण सांभाळणार याची चिंता होती. त्यांनी या पिल्लांना घराच्या पडवीत ठेवले होते. या पिल्लांना इतर कोंबड्याही शिवायला तयार नव्हत्या. परंतू शेतकरी खाटपे यांच्या एका कोंबड्याने या कोंबडीच्या पिल्लांना माया लावल्याचे उघडकीस आहे.

कोंबडी गेल्यानंतर अगदी कोंबडीप्रमाणे हा कोंबडा या पिलांना आपल्या पंखाखाली घेत त्यांना मायेची उब देत आहे. हा कोंबडा या पिल्लांना चोचीने दाणा भरवतोय, त्यांच्यासोबत अंगणात बांगडतोय, याशिवाय कावळा, घार मांजर, कुत्रे यांपासून पिल्लांचे संरक्षणासाठी धावून जात आहे. त्यामुळे अर्जुन खाटपे या शेतकऱ्यांच्या या लाल्या नावाच्या कोंबड्याने मोठे आश्चर्याचे काम केल्याने त्याला पाहायला लोक जमत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

आम्ही आता याला विकणार नाही

एरव्ही दूरपर्यंत फिरणारा कोंबडा आता या पिल्लांना सोडून क्षणभरही बाजूला जात नाहीए अशी घटना याआधी पाहिली नसल्याने हा कोंबडा परिसरात चांगलाच कौतुकाचा विषय ठरला आहे. या कोंबड्याला पाहायला गावासहित परिसरातील नागरिक येत असल्याचे खाटपे यांनी सांगितले. कोंबडा पिल्लांचा सांभाळ करत असून पिल्लांना कोंबडीप्रमाणे सर्व काही शिकवत असून आई नसताना पिल्लांचे संगोपन करणाऱ्या गुणी कोंबड्याला आम्ही आता विकणार नसून शेवटपर्यंत त्याचा सांभाळ करणार असल्याचे अलका खाटपे यांनी सांगितले. तर पारुबाई खाटपे यांनी माझ्या ८० वर्षाच्या आयुष्यात अशी घटना पाहिली नसून या कोंबड्याचे मला मोठे कौतुक वाटत असून या कोंबड्याला पाहायला गावासहित परिसरातील नागरिक येत असल्याचे म्हटले आहे.