महिलांना मोकळं रान द्या… सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महिला सक्षमीकरणावर महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी महिलांना रुढीपरंपरेच्या बंधनातून मुक्त करून विकासाचे मोकळे वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचे राष्ट्राच्या उन्नतीशी निकटचे नाते असल्याचे ते म्हणाले.

महिलांना मोकळं रान द्या... सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
Mohan Bhagwat
| Updated on: Jul 18, 2025 | 8:54 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच महिला सक्षमीकरणाबद्दल एक मोठे विधान केले आहे. महिलांना रुढी आणि परंपरेच्या जोखडातून बाहेर काढून त्यांना विकासाचे मोकळे रान द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. सोलापुरातील उद्योगवर्धिनी या महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या विधानावर विविध प्रतिक्रिया समोर आले.

मोहन भागवत यांनी नुकतंच सोलापुरातील एका कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि रुढी परंपरेबद्दल भाष्य केले. “पुरुष महिलांना धाकात ठेवू शकतो. धाकापोटी काम करुन घेऊ शकतो. धाकापोटी चांगल्या सवयी लावून देऊ शकतो. पण पुढे जर त्या टिकायच्या असतील तर ते वात्सल्य पाहिजे. त्यामुळे महिला घटक उभा राहणं हे राष्ट्राच्या उन्नतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. त्या करु इच्छितात, त्यासाठी त्यांना सक्षमता द्यावी, त्यासाठी त्यांना रुढी परंपरेच्या जाळ्यातून थोडं बाहेर काढून मोकळं रान द्यावं”, असे मोहन भागवत म्हणाले.

ती तिच्यासोबत कुटुंबाचाही उद्धार करते

देशाचे १४२ कोटी नागरिक जेव्हा देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन कार्य करतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाचे भाग्य बदलेल. केवळ मूठभर लोकांच्या प्रयत्नाने हे शक्य नाही. देशाचे भाग्य बदलण्यासाठी महिला घटक उभारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण महिलाच देशाचे भविष्य घडवू शकतात. एका पुरुषाने काम केल्यास तो एकटाच करतो. परंतु एक महिला काम करते तेव्हा ती तिच्यासोबत कुटुंबाचाही उद्धार करते, असेही मोहन भागवत यांनी अधोरेखित केले.

चांगल्या कामांचे महत्त्व आणि प्रेरणेचे स्रोत

मोहन भागवत यांनी यावेळी चांगल्या कामांचे महत्त्व आणि त्यामागील प्रेरणा स्पष्ट केली. जगात वाईट गोष्टी असल्या तरी त्यापेक्षा चाळीसपट अधिक चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे चिंता करण्याऐवजी चांगल्या कामांवर लक्ष केंद्रित करावे, असे ते म्हणाले. चांगल्या कामांमुळेच आणखी चांगली कामे सुरु होतात. त्यातून एक सकारात्मक साखळी निर्माण होते. झाडातून बीज येते आणि बिजातून पुन्हा झाड उत्पन्न होते, असे उदाहरण मोहन भागवत यांनी दिले.

अनेकदा लोक स्वार्थ किंवा भीतीपोटी काम करतात. चौकात लाल दिवा असताना लोक थांबत नाहीत, पण पोलीस दिसले की थांबतात, हे त्याचेच उदाहरण. मात्र, असे काम स्वार्थ थांबला की थांबून जाते. अहंकारातून केलेली कामेही ती व्यक्ती गेल्यानंतर थांबतात. याउलट, ‘ऐसी कळवळ्याची जाती, लाभावी प्रीती’ या उक्तीनुसार, माणसाच्या अंतःकरणात कुठेतरी करुणा असते आणि त्या कळवळ्यातून केलेली कामे चिरकाल टिकतात. आपलेपणाची कदर करणारा समाजच मोठा होतो. चांगल्या माणसांचा समाज नेहमीच सुरक्षित व संघटित असतो. देशाला संपूर्ण समाजाला संघटित करून आपले गतवैभव परत मिळवायचे आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले.

डॉ. हेडगेवार यांनी कार्यकर्ते किंवा सत्ता नसतानाही, तसेच त्यांच्या विचारांना विरोध असतानाही काम सुरू केले, कारण त्यांनी कधीही त्याचा विचार केला नाही. जयप्रकाश नारायण यांनी एकदा संघाच्या बैठकीत विचारले होते की, ४० वर्षे काम करूनही तुम्हाला काही मिळत नाही, तरीही तुम्ही काम करता, याची प्रेरणा काय आहे? त्यावर एका संघ कार्यकर्त्यांने उत्तर दिले, “समाजातील दुःख हीच आमची प्रेरणा आहे. जोपर्यंत ते संपत नाही, तोपर्यंत आमचे कार्य सुरूच राहणार.” हीच भावना संघाच्या कार्यामागे असल्याचे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.