नागपूरमध्ये संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ कार्यक्रमाचं उद्या सूप वाजणार; मोहन भागवत यांच्या भाषणाकडे लक्ष
नागपूरमध्ये संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ कार्यक्रमाचा उद्या समापन समारोह होणार आहे. या कार्यक्रमात मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करतील.

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचे येत्या 5 जून रोजी समापन होणार आहे. नागपुरातील रेशीम बागेत या विकासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याकाळी 6.30 वाजता या विकासवर्गाच्या समापन समारोहाला सुरुवात होईल. या कार्यक्रमासाठी माजी केंदीय मंत्री अरविंद नेताम हे प्रमुख पाहुणे असतील. तर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. कार्यकर्ता विकास वर्गाला 12 मे रोजी सुरुवात झाली होती. एकूण 25 दिवस हा विकास वर्गाचा कार्यक्रम चालू होता. या विकासवर्गात एकूण 840 स्वयंसेवकांनी भाग घेतला.
40 वर्षांपेक्षा कमी वय असणारे स्वयंसेवक सहभागी
या विकासवर्गात देशभरातील स्वयंसेवकांनी उत्साहात भाग घेतला. विशेष म्हणजे या विकास वर्गाला जम्मू-काश्मीरमधूनही काही स्वयंसेवक सहभागी झाले होते. विकासवर्गात 40 वर्षांपेक्षा कमी वय असणारे स्वयंसेवक सहभागी झाले होते. विशेषत: ज्या स्वयंसेवकांनी जिल्हास्तरीय, प्रांतस्तरीय प्रशिक्षण शिबिरात भाग घेतलेला आहे, अशा स्वयंसेवकांना या विकास वर्गात बोलवण्यात आले होते. कमी काळात स्वयंसेवकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश या विकासवर्गाचा होता.
शिबिरातून सक्षम स्वयंसेवक पुढे येतात- मोहंती
विकास वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ओडिसा प्रांताचे संघचालक समीर कुमार मोहंती यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले होते. अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून राष्ट्रवादाचा अनुभव येतो. अशा शिबिरांत स्वयंसेवकांना भारताची विविधता अनुभवता येते. देशात विविधता असली तर विचार मात्र एक आहे, हेच अशा प्रकारच्या शिबिरांतून समोर येते. या शिबिरातून सक्षम स्वयंसेवक पुढे येतात, अशा भावना मोहंती यांनी व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना उद्देशून नेमका काय संदेश देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
