मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेत भूतबाधेची अफवा, भीतीने मुली शाळा सोडून घरी गेल्या..
मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी भूतबाधा झाल्याच्या भीतीने शाळा सोडून गेल्या घरी गेल्या आहेत. या मुलींना पुन्हा शाळेत कसे आणायचे याची चिंता शाळा प्रशासनाला पडली असून विद्यार्थींनींचे काऊन्सिलिंग करण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात चिखलदार तालुक्यातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरल्याने मुलींना शाळा सोडून आपले गाव गाठल्याची घटना घडली आहे. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जिल्ह्यातच अशा प्रकारे अंधश्रद्धेला पुर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सात ते आठ दिवसांपूर्वी डोमा येथील आदिवासी आश्रम शाळेतील १६ विद्यार्थीनी अचानक हसायला लागल्या, रडायला लागल्या होत्या. तर काहींना घुंगरांचे आवाज ऐकायला येऊ लागले होते. ही बाब वस्तीगृहाच्या अधीक्षिका यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात ही बाब आणून दिली. मात्र दुसऱ्या दिवशी ही बातमी गावात पसरतात मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरली आणि जवळपास 300 च्यावर मुली वस्तीगृह सोडून आपापल्या गावी निघून गेल्या. यात सर्वात जास्त मुली या एकताई गावातील रहिवासी आहेत.
या आश्रम शाळेत आरोग्य विभागाचे पथक देखील दाखल झाले असून त्यांनी ही भूतबाधा नसून ‘मास हिस्टेरीया’ हा मानसिक आजाराचा प्रकार असल्याचे सांगितले. सर्व विद्यार्थिनी आणि पालकांशी त्यांचं काऊन्सिलिंग सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदिनी जाधव, प्रवीण देशमुख देखील मुंबईवरून या ठिकाणी येऊन मुलींचे काऊन्सिलिंग करत आहेत.
या आदिवासी आश्रम शाळेमध्ये जवळपास ८१० विद्यार्थी आहेत,तर निवासी आश्रमशाळेमध्ये ३१० मुली राहतात. मुलींना समुपदेशन करून त्यांना शाळेत पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अफवा कशी पसरली…
या आदिवासी आश्रम शाळेमध्ये काही वर्षांपूर्वी नवीन वस्तीगृह बांधण्यात आले आहे. या ठिकाणी एक मोहाचे झाडं होते ते कापण्यात आले. त्यामुळे ते भूत या ठिकाणी फिरत आहे असा गैरसमज पसरला आहे. खरंतर या जगात भुताचे अस्तित्व नाही, मात्र तरी देखील आदिवासी मुलींमध्ये भुताची भीती पसरली आहे. सध्या निवासी आदिवासी आश्रम शाळेमध्ये एकही मुलगी परत आलेली नाही.