वरळीत सचिन अहिर विरूद्ध आदित्य ठाकरे सामना रंगणार? एकनाथ शिंदेंनी दिली सर्वात मोठी अपडेट
Sachin Ahir vs Aaditya Thackeray : सचिन अहिर हे मुंबईतील वरळी परिसरातून आहेत, ते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता 2029 च्या विधानसभा निवडणूकीत सचिन अहिर विरूद्ध आदित्य ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही काळापासून मोठे धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आता आमदार सचिन यांनीही ठाकरेंची साथ सोडली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. सचिन अहिर हे मुंबईतील वरळी परिसरातून आहेत, ते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून त्यांनी याआधीही निवडणूक लढवलेली आहे. अशातच आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता 2029 च्या विधानसभा निवडणूकीत सचिन अहिर विरूद्ध आदित्य ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
सचिन अहिर यांना वरळीतून उमेदवारी ?
सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून सचिन अहिर यांना विधानसभेचे तिकीट देणार का असा प्रश्न विचारला होता. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी, ‘वरळी विधानसभेला तीन वर्ष आहेत. आता अहिर आमदार आहेत. आम्ही कुणालाही बघून कोणताही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. निर्णय घेत नाही. वेळ येईल तसा निर्णय घ्यायला पाहिजे’ असं विधान केलेले आहे. तसेच सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती आपण पार पाडू असं विधान केलं आहे. त्यामुळे आगामी काळात सचिन अहिर विरूद्ध आदित्य ठाकरे यांच्यात सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं कार्ट…
पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘काही लोक सोडून गेल्यावर त्याबाबत चर्चा करतात. असे पर्यंत चांगला. आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट असं सुरू आहे. आताही काही लोकं काही म्हणतात त्यावर मी बोलणार नाही. आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातो, विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी पुढे जात आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही पुढे जात आहे.’