एकच उमेदवार दोन पक्षांकडून मैदानात!छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सावळागोंधळ, त्या ट्विटने मोठी खळबळ

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026: एकाच महापालिकेत एकच उमेदवार दोन पक्षांकडून दोन वेगवेगळ्या वॉर्डातून, प्रभागातून निवडणूक लढवत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात येत आहे. याप्रकारावरून राज्य निवडणूक आयोगावर एमआयएमने निशाणा साधला आहे.

एकच उमेदवार दोन पक्षांकडून मैदानात!छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सावळागोंधळ, त्या ट्विटने मोठी खळबळ
छत्रपती संभाजीनगर महापालिका २०२६
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
KALYAN DESHMUKH | Updated on: Jan 15, 2026 | 8:57 AM

AIMIM Leader Imtaiz Jaleel Big Claim: आज राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदानाचा उत्सव सुरु झाला आहे. सकाळपासून अनेक ठिकाणी मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या लोकशाहीच्या उत्सवात मतदार उत्साहाने सहभागी झाले आहेत. पण छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सकाळीच एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. एकाच महापालिकेत एकच उमेदवार दोन पक्षांकडून दोन वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या घडामोडींवरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काय आहे ती महत्त्वाची अपडेट?

इम्तियाज जलील यांच्या ट्विटने खळबळ

छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले आहे. एकच उमेदवार एकाच महानगरपालिकेतील दोन पक्षांकडून दोन वेगवेगळ्या प्रभागांमधून निवडणूक लढवू शकतो का? असा सवाल त्यांनी या ट्विटमधून केला आहे. पण छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकत असंच घडल्याचा त्यांचा दावा आहे. इथं एक उमेदवार एका प्रभागातून काँग्रेसेच्या तिकीटावर आणि दुसऱ्या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता यावर राज्य निवडणूक आयोग स्पष्टीकरण देईल का, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.


नियम सांगतो काय?

अर्थात दोन भिन्न मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि बडोदा येथून तर राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे हाच नियम महानगरापालिकेत लागू असल्याचे मानले जात आहे. एक उमेदवार दोन भिन्न मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. तसेच दोन भिन्न प्रभागातून हा उमेदवार निवडणूक लढवत आहे. पण त्याला एकाच प्रभागाचे नेतृत्व करता येईल. कदाचित तो जर दोन्ही प्रभागातून जिंकला तर मात्र मग एका ठिकाणी त्याला राजीनामा द्यावा लागेल. त्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल.

त्या उमेदवाराची चर्चा

आता हा लकी उमेदवार कोण आहे, याची चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगली आहे. कारण तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. भाजपमधील नाराजी चव्हाट्यावर आली होती. एकीकडे तिकीटासाठी इतकी मारामार झाली असताना या उमेदवाराला दोन पक्षांनी उमेदवारी दिल्याने त्याची चर्चा होत आहे. आता हा उमेदवार कोणत्या प्रभागातून निवडून येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.