मनसे, ठाकरे गट युतीची चर्चा, घडामोडींना वेग; दोन बड्या नेत्यांची भेट

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मनसे, ठाकरे गट युतीची चर्चा, घडामोडींना वेग; दोन बड्या नेत्यांची भेट
| Updated on: Apr 21, 2025 | 4:09 PM

महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिवसेना ठाकरे गटासोबत युती संदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रासमोर आमची भांडणं, वाद हे किरकोळ आहे, त्यामुळे एकत्र येण्यात मला तरी कुठलीही अडचण वाटत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भुमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे नेते सुहास दशरथे यांनी माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंची भेट घेतली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. लोकलमध्ये आम्ही सर्व नेते एकत्रच काम करतो, सगळ्यांना आनंद झाला, छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना आनंद झाला. तो म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत, अशी प्रतिक्रिया या भेटीवर चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

सुहास दशरथे नेमकं काय म्हणाले? 

या भेटीवर सुहास दशरथे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. युतीसंदर्भात कोणी काही बोलू नका, असा आदेश राज ठकरे यांचा आहे. त्यामुळे यावर मी काही जास्त भाष्य करणार नाही. परंतु लग्नामध्ये आम्ही आता भेटलो. त्यामुळे जुने सहकारी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्ष सत्तेत राहिलेले मोठे नेते म्हणून चंद्रकांत खैरे यांचा सत्कार करण्याची इच्छा झाली. हे दोन्ही बंधू एकत्र येतात ही आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मी खैरे यांना सांगितलं पुन्हा एकदा तुम्ही आमचे मार्गदर्शक व्हा, संपूर्ण मराठवाड्यात मनसे आणि शिवसेना जोरदार घोडदौड करेल, असं दशरथे यांनी म्हटलं आहे.