Paithan: आस विठोबाची… संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा वेध, पैठण ते पंढरपूर आषाढी वारी, असा आहे दिंडी मार्ग
Sant Eknath Maharaj Palkhi Sohala: पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात आज संध्याकाळी प्रस्थान होईल. यंदा संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ४२७ वे वर्ष आहे. रामकृष्ण हरी गजरात भाविकांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले. असा आहे पालखीचा मार्ग

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: आषाढी वारीचे वेध लागलेल्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानातून आज संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान होत आहे. यंदा अधिकमासामुळे पालखीचे प्रस्थान नेहमीपेक्षा उशिरा होत असून, हा ऐतिहासिक पालखी सोहळ्याचा ४२७ वे वर्ष आहे.
पहाटे काकड आरती, महापूजा, पादुकांची पूजा आणि पारंपरिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर चांदीच्या रथात विराजमान संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचे विधिवत प्रस्थान होणार आहे. टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या अखंड गजरात हजारो वारकरी, दिंड्या आणि भाविक पालखीसोबत पंढरपूरच्या (Sant Eknath Maharaj Palkhi Sohala) दिशेने मार्गस्थ होणार आहेत. राज्याच्या विविध भागांतून भाविक पैठणमध्ये दाखल झाल्याने संपूर्ण नाथनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.
संत एकनाथ महारांजा पालखी सोहळा
संत एकनाथ महाराजांनी भागवत धर्म, समता, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यांच्या समाधीनंतर त्यांचे सुपुत्र हरिपंडित महाराज यांनी पादुका पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केल्याचे मानले जाते. पुढे ही परंपरा पालखी सोहळ्याच्या रूपाने विकसित झाली आणि आज ती अखंडपणे सुरू आहे. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच संत एकनाथ महाराजांच्या पालखीला अत्यंत मानाचे स्थान आहे.
यंदाचा पालखी सोहळा सुमारे २८५ किलोमीटरचा प्रवास करत २४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. मार्गात चनकवाडी, हादगाव, लाडजळगाव, कुंडल पारगाव, मुंगसवाडे, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ, खर्डा, दांडेगाव, अनाळे, परंडा, बिटरगाव, कुर्दू, अरण-करकंब आणि होळे येथे पालखीचे मुक्काम होणार आहेत. प्रवासादरम्यान पाच पारंपरिक रिंगण सोहळेही पार पडणार आहेत.
पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. प्रत्येक गावात पालखीचे स्वागत फुलांची उधळण, रांगोळ्या आणि हरिनामाच्या गजरात केले जाणार आहे. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
पालखी मुक्काम
७ जुलै – चनकवाडी (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर)
८ जुलै – हादगाव (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर)
९ जुलै – कुंडल पारगाव (जि. बीड)
१० जुलै – मुंगसवाडे (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर)
११ जुलै – राक्षसभुवन (ता. शिरूर कासार, जि. बीड)
१२ जुलै – रायमोह (जि. बीड)
१३ जुलै – पाटोदा (जि. बीड)
१४ जुलै – दिघोळ (जि. अहिल्यानगर)
१५ जुलै – खर्डा (जि. अहिल्यानगर)
१६ जुलै – दांडेगाव (ता. भूम, जि. धाराशिव)
१७ जुलै – अनाळे (ता. परंडा, जि. धाराशिव)
१८ जुलै – परंडा (जि. धाराशिव)
१९ जुलै – बिटरगाव (ता. माढा, जि. सोलापूर)
२० जुलै – कुर्डू (ता. माढा, जि. सोलापूर)
२१ जुलै – अरण (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)
२२ जुलै – करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)
२३ जुलै – होळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)
२४ जुलै – पंढरपूर (आगमन)
रिंगण सोहळे
१० जुलै – मिडसांगवी (पहिले रिंगण)
१४ जुलै – पारगाव घुमरे (दुसरे रिंगण)
१७ जुलै – नांगरडोह (तिसरे रिंगण)
२० जुलै – कव्हेदंड (चौथे रिंगण)
२४ जुलै – पंढरपूर (उभे रिंगण व पादुका आरती)
पालखीला 427 वर्षाचा इतिहास
चांदीच्या रथातून संत एकनाथ महाराजांच्या पादुका टाळ – मृदंग आणि हरिनामाच्या गजरात आज प्रस्थान होतील. राज्यभरातून हजारो वारकरी पैठणमध्ये दाखल; नाथनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. सुमारे २८५ किलोमीटरचा पालखी प्रवास करून २४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये आगमन होईल. मार्गात १७ मुक्काम आणि ५ पारंपरिक रिंगण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देत संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
नाथ महाराजांच्या पालखीचे हे 427 वर्ष आहे. पादुका पूर्वी डोक्यावरून पंढरीची वारी करत होत्या त्यानंतर जानकीबाईंनी चार पिढ्या नंतर जानकीबाईंनी पालखीचे स्वरूप दिलं. त्यानंतर नारायण महाराज पालखी वाल्यांनी मूर्त स्वरूप केलं मुक्काम रिंगण सोहळे ठरवून घेतले. त्या संपूर्ण पालखी मार्ग हा ग्रामीण भागातून आहे शहरी भागातून नाही. या पालखीसोबत आता बरोबर 42 दिंड्या चालत आहेत, जुन्या दिंड्यांची संस्थान व्यवस्था करत आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अहिल्यानगर सोलापूर असा प्रवास करून अठराव्या दिवशी पालखी पंढरपूरला पोहोचते. बाकी संतांचा काला गोपालपुरला होतो मात्र नाथ महाराजांचा काला पांडुरंगाच्या मंदिरात होतो.
427 वर्षाचा इतिहास आणि बदल
या पालखीचा खूप खडतर प्रवास होता बाकीच्या पालख्या शहरी भागातून जातात.
ही पालखी डोंगरदर्यातून जाते आणि ठिकाणी डोंगर आहेत त्या ठिकाणी रस्ता नसताना सुद्धा टेंभे घेऊन ही पालखी गेली आहे बैलगाड्या होत्या.
काही रस्ते झाले आहेत काही रस्त्यांची शासनाकडे मागणी आहे आठ आठ दहा वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था आहे.
काही महामार्ग आहेत पंढरपूर ते पैठण याची खूप दुरावस्था झाली आहे.
हा पालखी मार्ग ग्रामीण भागातून जातो शासनाने याकडे लक्ष द्यावे मुख्यमंत्र्याकडे आम्ही निवेदन देऊन मागणी केली आहे.
सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्हा सगळ्या पालकासाठी विशेष व्यवस्था करतो मात्र मराठवाड्यातून तशी व्यवस्था होत नाही.
42 दिंड्या सोबत आहेत 25 ते 30 हजार वारकरी सोबत असतात.
सोलापूर जिल्ह्याचा रस्ता पूर्ण झाला आहे धाराशिव मध्ये रस्त्याचे काम सुरू आहे अनेक ठिकाणी पालखी मार्ग सोडून काम होत आहे पालखी मार्गावर काम हो ही आमची धारणा आहे.
पूर्वीचा काळ गरिबीचा होता आता वैभव संपन्न आहे पालखी.
आता पावलोपावली लोक अन्नदानासाठी तयार आहेत.
गेल्या वर्षी भाविकांच्या देणगीतून नाथ महाराजांचा 150 किलोचा चांदीचा रथ केला आहे.
पूर्वी पालखी खांद्यावरून जात होती 86 महाराजांनी त्याला रथातून नेण्यास सुरुवात केली.
पैठण ते पंढरपूर नाथ महाराजांच्या पालखीच्या रस्त्याची दुरुस्त झाली आहे मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी.
पालखी प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे