
Sangita Bhalerao : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. त्यांनी आपला पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता रुपाली चाकणकर यांच्याविरोधात संगिता भालेराव या महिला आयोगात तक्रार दिली आहे. चाकणकरांकडून माझ्या जीवितास धोका आहे, असा आरोप त्यांनी केलाय. त्यानंतर आता हे प्रकरण नेमकं काय आहे? याबाबत खुद्द संगीता भालेराव यांनीच सविस्तर माहिती दिली आहे.
संगीता भालेराव यांनी तक्रार दिल्यानंतर टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. त्यांनी रुपाली चाकणकर यांच्याविषयी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. याच पोस्टनंतर त्यांना चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येत होते. मी कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केलेली नाही. त्यांनी पदमुक्त व्हावे अशी मागणी केली होती, अशी माहिती भालेराव यांनी दिली.
तसेच हगवणे कुटुंबातील दुसरी सून मयुरी जगताप यांनी महिला आयोगाकडे एक अर्ज केला होता. या अर्जावर कारवाई झाली असती वैष्णवी आज जिवंत असती. हसती-खेळती मुलगी होती ती. एवढा हुंडा दिलेला असूनही तिला मारण्यात आलं. तिचा खूनच करण्यात आलाय, असा आरोप यावेळी भालेराव यांनी केली. तसेच अशा घटनांकडे दुर्लक्ष करता कामा नये. आज चार वर्षांच्या मुलींवर बलात्कार होतो. मग महिला आयोगाचं याकडे लक्ष असायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मी रुपाली चाकणकर यांच्या वैयक्तिक द्वेष करत नाही. पण त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आहे. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाही आहेत. याच कारणामुळे मी त्यांना सांगितलं त्यांनी महिला आयोगाचं पद सोडावं, असं म्हटलं ज्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान आहे, ज्या व्यक्तीला सामाजिक जाणीवांचं भान आहे, अशा व्यक्तीला महिला आयोगचं अध्यक्षपद द्यायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच तळमळीच्या भावनातून मी ती पोस्ट केली होती, असेही भालेराव यांनी स्पष्ट केलं.