गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच सांगली शहर हळहळलं, दोन तरुण बाप्पाच्या विसर्जनासाठी गेले आणि…

सांगलीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण कृष्णा नदीत वाहून गेले आहेत. त्यांचा शोध रेस्क्यू टीमकडून घेतला जात आहे. या घटनेमुळे सांगली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे तरुण मंडळाची गेल्या वर्षाच्या गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात गेले होते. यावेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते वाहून गेले.

गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच सांगली शहर हळहळलं, दोन तरुण बाप्पाच्या विसर्जनासाठी गेले आणि...
गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच सांगली शहर हळहळलं
| Edited By: | Updated on: Sep 05, 2024 | 10:26 PM

मागील वर्षाची गणेश मूर्ती नदीत विसर्जन करायला गेलेल्या मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांपैकी दोन कार्यकर्ते वाहून गेल्याची घटना सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात घडली आहे. संबंधित घटना गुरुवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सांगलीच्या सरकारी घाटाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक जण बचावला आहे. घटनेनंतर महापालिकेची स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आयुष्य सेवाभावी संस्था यांच्याकडून नदी पात्रामध्ये वाहून गेलेल्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. मात्र सायंकाळ झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. उद्या सकाळपासून पुन्हा ती शोध मोहीम सुरू केली जाणार आहे.

अक्षय बनसे आणि आदित्य रजपूत असे नदीत वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्व तरुण शिवाजी मंडळी येथील टेकडीचा राजा मंडळाचे कार्यकर्ते आहेत. या मंडळाची मागील वर्षाची साडेचार फुटी गणेश मूर्ती आहे. ही गणेशमूर्ती गणेश उत्सवापूर्वी विसर्जित केली जाते आणि उत्सवात नवीन मूर्ती प्रतिष्ठापीत केली जाते. त्यामुळे मंडळाची गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी आज मंडळाचे दहा ते बारा कार्यकर्ते मूर्ती घेऊन नदीपत्रात उतरले होते. यावेळी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यानंतर त्यापैकी काही कार्यकर्ते हे पुन्हा वरती आले.

अक्षय आणि आदीत्य आणि अन्य एक असे तीन जण प्रवाहाच्या पाण्यात सापडले. कृष्णेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हे दोघे प्रवाहात वाहून गेले आहेत. आज पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून याची माहिती कळतात बेपत्ता तरुणांचे नातेवाईक, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, तसेच महापालिका स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आयुष्य संस्था यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. यावेळी बोटीच्या सहाय्याने दोन्हीही बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यात आला.

तब्बल दीड तास ही शोध मोहीम सुरू होती. मात्र अंधार पडल्यानंतर शोधकार्यात अडथळे निर्माण झाल्याने शोध मोहीम थांबण्यास आली. ती शोध मोहीम पुन्हा उद्या सकाळपासून सुरू केली जाणार आहे. वाहून गेलेल्या तरुणांमधील अक्षय हा खासगी नोकरी करतो. तर आदित्य हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या घटनेनंतर नदी काठावर मोठी गर्दी झाली होती. तर तरुणांच्या कुटुंबांनी एकच हंबरडा फोडला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मंडळाच्या कार्यकर्त्याच्या अशी दुर्दैवी घटना घडल्याने सांगलीत हळहळ व्यक्त होत आहे.