
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची हाक दिली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. यावरुनच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि भाजपच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
संजय राऊत यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्य केले. आमची अपेक्षा होती की देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील, त्यांना दिलासा देतील, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना मराठा बांधवांकडे जाऊन त्यांचं दुःख ऐकण्याचा वेळ नव्हता, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत आणि त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसात उपोषणाला बसले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊनही जरांगे पाटील यांना भेटले नाहीत, ही बाब अत्यंत निराशाजनक आहे. राऊत यांनी सवाल केला की, “जे गृहमंत्री कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, ते मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करू शकत नाहीत? त्यांना मराठा समाजाला न्याय देण्याचं श्रेय घेता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही, असे संजय राऊत म्हणाले.
अमित शहा यांचा मुंबई दौरा मराठा समाजाला भेटण्यासाठी नसून, मुंबईचा महापौर भाजपचाच (म्हणजे गुजराती) व्हावा, हे सांगण्यासाठी होता. “लालबागच्या राजाकडे गृहमंत्री काय प्रार्थना करतात? मुंबईचा महापौर उपरा होऊ दे, भाजपचा होऊ दे, हीच प्रार्थना ते करतात का? असा सवालही राऊतांनी केला.
शिंदे शेपटी हलवत अमित शहांच्या मागे फिरतात. मराठा समाजाचा इतका गंभीर प्रश्न सुरू असताना, ते दरे गावात जाऊन यज्ञ करायला बसले आहेत. तुम्ही कसले मराठा? शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नकाय. फडणवीस हे कसले मराठे? हे लोक मराठी माणसासाठी कलंक आहेत. त्यांना मराठा लोकांची काळजी नाही, उलट मराठी माणसाला संपवण्यासाठीच त्यांचे सरकार इथे आले आहे, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.
या आंदोलकांमुळे आम्हाला कोणताही त्रास होत नाही, उलट यामुळे मराठी ताकद देशाला कळेल. उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना मराठा बांधवांसाठी अन्न, पाणी आणि निवारा अशा अत्यावश्यक सुविधा पुरवण्याचे आवाहन केले आहे. हे सरकार त्यांना मदत करण्यास मागेपुढे पाहत आहे. या गंभीर परिस्थितीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषणाला बसायला पाहिजे होते. मात्र, हे दोन्ही नेते भाजपचे हस्तक बनले आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की लोकप्रतिनिधी लोकप्रश्नांकडे दुर्लक्ष करून दरे गावात यज्ञ करायला बसले आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.