संजय राऊतांनी फडणवीसांसोबत लावली 11 लाखांची पैज, म्हणाले भाऊसाहेब फक्त एकच अट…

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना ११ लाखांचे खुले आव्हान दिले आहे. धार्मिक मुद्द्यांशिवाय निवडणूक लढवून दाखवा, असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊतांनी फडणवीसांसोबत लावली 11 लाखांची पैज, म्हणाले भाऊसाहेब फक्त एकच अट...
Sanjay Raut Devendra Fadnavis
| Updated on: Jan 11, 2026 | 10:35 AM

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विकासाचा मुद्दा विरुद्ध धर्माचे राजकारण असा तीव्र संघर्ष सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विकासावर बोलण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा समाचार घेताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज देत उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली १ लाखांची बक्षीस रक्कम आता थेट ११ लाख रुपयांवर नेली आहे.

११ लाखांचे चॅलेंज काय?

हिंदू-मुसलमान किंवा भारत-पाकिस्तान या विषयांचा आधार न घेता भाजपने एखादी निवडणूक लढवून दाखवावी, मी त्यांना १ लाख रुपये देईन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून म्हटले होते. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंचे १ लाख आणि त्यात माझे १० लाख रुपये मिळवून मी ११ लाख रुपये द्यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस हे जर स्वतःला शूर आणि महान समजत असतील, तर त्यांनी हे चॅलेंज स्वीकारावे आणि हिंदू-मुस्लिम वादाशिवाय निवडणूक लढवून दाखवावी.”

यावेळी विकासाच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी आणि कचरा यांसारख्या नागरी सुविधांवर चर्चा व्हायला हवी. मात्र, भाजप तिथेही अयोध्या, जय श्री राम आणि बाबरी मशीद असे धार्मिक मुद्दे आणून लोकांची दिशाभूल करत आहे. आज जी मुंबई तुम्हाला दिसतेय, त्यात ५६ पेक्षा जास्त उड्डाणपूल आणि मोठे प्रकल्प हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून उभे राहिले आहेत. तेव्हा भाऊसाहेब, देवेंद्र भाऊ तुम्हीही आमच्या सोबतच होता. जे काम शिवसेनेने केले आहे, त्याचे श्रेय चोरू नका, असे संजय राऊत म्हणाले.

आमची संपूर्ण हयात मुंबईत मराठी माणसाचे हक्क टिकवण्यात गेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तर उभे राहिलेच आहे, पण मराठी माणसाला ताठ मानेने जगता येणे, हाच खरा विकास आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि जबाबदार नेते आहात. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीने खोटे बोलणे तुम्हाला शोभत नाही. जे काम झाले आहे ते झाले आहे, जे नाही झाले ते नाही. पक्षनिधीसाठी हवे असतील तर हे ११ लाख रुपये तुम्ही कधीही घेऊन जाऊ शकता, पण आधी धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवा, असे चॅलेंज संजय राऊतांनी दिले.