
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मदतानावरून महाविकास आघाडीने महायुतीवर टीका केली होती. आता मंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून सर्वच पक्ष त्याची कसून तयारी सुरू केली आहे. मात्र त्याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान करत सरकारला मोठं आव्हान केलं आहे. विधानसभा ज्या पद्धतीने तुम्ही जिंकला, त्यावरून तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर छी थू झाली. कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या निवडणुका हायजॅक केल्या, जिंकल्या ते दिसलं. पण महापालिकेत तुम्ही तेच करू इच्छित आहात. पण मुंबईतला समस्त मुंबईकर आणि मराठी माणूस तुमचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असे राऊत यांनी बजावलं. मुंबईची निवडणूक तरी बॅलेटपेपरवर घेऊन दाखवा, असं आव्हान राऊतांनी सरकारला दिलं.
काय म्हणाले संजय राऊत ?
मुख्यमंत्र्यांची ही धमकी आहे. अशा प्रकारच्या धमक्या त्यांनी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेला दिल्या. आता ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेतही अशा धमक्या देतील. हे धमक्या देऊनच निवडणूक जिंकत आहेत ना. निधी, धमक्या, खंडण्या… त्यानंतर कायद्याचा गैरवापर. मुंबई त्यांना जिंकायची आहे. ते कशा पद्धतीने निवडणूक जिंकतात, ही ईस्ट इंडिया कंपनीचे पार्टनर आहेत. एक्स्टेंडेड ब्रँच ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. यांचं हेड क्वॉर्टर सुरतला आहे. आता मुंबई जिंकायची आणि अमित शाह यांच्या, व्यापाऱ्यांच्या पायाशी टाकायची हे यांचं धोरण आहे. जसं पोर्तुगीजांकडून ब्रिटीशांनी मुंबई घेतली. मग याला भेट दिली. त्याला नजराना दिला. तसं फडणवीस यांना मुंबईचा नजराना ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सुरत यांना द्यायचा आहे. किंवा अहमदाबादला द्यायचा. त्यासाठी धमक्या, दहशत आणि आर्थिक उलाढाली सुरू आहेत अशी टीका राऊतांनी केली.
मराठी माणूस तुमचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही
मुंबईचं चित्र वेगळं आहे. विधानसभा ज्या पद्धतीने तुम्ही जिंकला, त्यावरून तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर छी थू झाली आहे. कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या निवडणुका हायजॅक केल्या, जिंकल्या, बनावट आणि बोगस नावं टाकून ६२ ते ७० लाख मते एका तासात वाढवली. हे काही लोकशाही सदृढ असल्याचं लक्षण नाही. पण महापालिकेत तुम्ही तेच करू इच्छित आहात. पण मुंबईतला समस्त मुंबईकर आणि मराठी माणूस तुमचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा राूतांनी दिला.
धमक्या काय देता? मला जर मतं दिली तर निधी देईल, हे बोलणं कोणत्या संविधानात बसतं ? असा थेट सवाल राऊतांनी विचारल. तुम्ही संविधान विरोधी आहात, कायदे विरोधी आहात असं आम्ही म्हणतो ते याचसाठी. मला मत दिलं तर तुमचा विकास करू. ते शहराचा, राज्याचा, देशाचा विकास करायला बांधिल नाहीत. जे त्यांच्यासोबत नाहीत त्यांना दारिद्र्यात आणि अविकसित ठेवणार आहेत, अशी टीका राऊतांनी केली. हे यांचं वेगळं संविधान, मनुवाद आहे. मनुस्मृतीचं संविधान यांचं बनलं आहे. ठिक आहे. त्यांना करू द्या. काही हरकत नाही, असंही राऊत म्हणाले.
या निवडणुका फक्त भाजपच्या नाही..
निवडणुका घेण्याआधी सर्व पक्षांची बैठक घेतली पाहिजे. या निवडणुका फक्त भाजपच्या नाहीत, तर या लोकशाहीच्या निवडणुका आहेत. त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. निवडणुकांच्या तारखा, पाऊस, सण, उत्सव, शाळा वगैरे या संदर्भात चर्चा केली पाहिजे. ते विरोधी पक्षांची अडचण बघून, सेटिंग बघून ते निवडणुकीची तयारी करतील. तारखा जाहीर करतील. पण आमची तयारी आहे असा टोला राऊतांनी लगावला.
हा पैशाचाच खेळ आहे. फडणवीस म्हणतात निधी देऊ. मिस्टर शिंदे रोकड्यात पैसे वाटतात, त्यांच्या गाड्यात पैसे ठेवतात. एखाद्या भागात जातात, माजी नगरसेवकांना बोलावतात आणि त्याच्या हातात बॅग टेकवतात आणि त्याचा प्रवेश करून घेतात. ही कोणती लोकशाही आहे? तुम्हाला 150 जागा जिंकायच्या आहेत. तुम्ही मुंबईची निवडणूक तरी बॅलेटपेपरवर घेऊन दाखवाच असं आव्हान राऊत यांनी सरकारला दिलं.
अजित पवार, शिंदे , फडणवीस म्हणजे…
यावेळी राऊतांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांवरही कडाडू टीका केली. 100 जागा शिंदे लढणार आहेत. पण रूढ अर्थाने पाहिले तर त्यांच्याकडे 100 चांगले कार्यकर्ते नाहीत. हा केवळ निधी आणि पैशाचा खेळ आहेत. हे सर्व गुळाची ढेप आहेत. अजित पवार, शिंदे आणि फडणवीस हे गुळाची ढेप आहे. या गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. आज या ढेपेला मुंगळे चिकटले. उद्या सरकार बदलले तर दुसऱ्या ढेपेला जातील. यांच्याकडे 100 सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते नसतील अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.