मविआ सरकार पाडलं म्हणून पुरस्कार दिला का? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच संजय राऊतांचा संताप

राष्ट्रपतींचे भाषण, बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार यांवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. बांगलादेशप्रश्नी लष्करी कारवाईची मागणी करत त्यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरूनही गृहखात्याला धारेवर धरले.

मविआ सरकार पाडलं म्हणून पुरस्कार दिला का? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच संजय राऊतांचा संताप
bhagat singh koshyari sanjay raut
| Updated on: Jan 26, 2026 | 12:11 PM

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून जगाला शांततेचा संदेश दिला असला, तरी सध्या खुद्द आपल्याच देशात आणि सीमेवर अशांतता व अस्थिरतेचे वातावरण आहे. शेजारील बांगलादेशात दररोज हिंदूंच्या नरसंहाराच्या बातम्या येत आहेत, तिथे कालच दोन हिंदूंना जिवंत जाळण्यात आले. अशा भीषण परिस्थितीत केवळ शांततेचे आवाहन करून हे हत्याकांड थांबणार आहे का? जर शांतता प्रस्थापित करायची असेल, तर केवळ उपदेश करून उपयोग नाही; त्यासाठी इंदिरा गांधींनी दाखवले होते तसे धाडस दाखवून लष्करी कारवाई करण्याची गरज आहे, अशा कडक शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींचे भाषण, बांगलादेशातील हिंदूंची स्थिती, भगतसिंग कोश्यारी यांचा सन्मान आणि राज्यातील ड्रग्ज प्रकरणावर सडकून टीका केली.

हा पुरस्कार संविधानाची हत्या करण्यासाठी दिला आहे का?

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सन्मानित करण्याच्या निर्णयावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून मविआचे सरकार उखडून टाकले. त्यांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा अपमान केला, त्यांना मोदी सरकार पद्मभूषण देऊन सन्मानित करत असेल, तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा पुरस्कार संविधानाची हत्या करण्यासाठी दिला आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

भाजपकडून होत असलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. हिरवा रंग हा कोणाच्या मालकीचा नाही. महाराष्ट्रात हरितक्रांती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हिरवा आहेच. भाजपचा हा जुना धंदा आहे. भगवा हे स्वराज्याचे प्रतीक असून शिवाजी महाराजांचे विचार सर्वत्र पसरवणे हाच आमचा उद्देश आहे, असे संजय राऊत म्हणाले.

लापता जेंटस कुठे आहेत?

यावेळी संजय राऊतांनी साताऱ्यात वारंवार सापडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणावरून गृहखात्याला धारेवर धरले. साताऱ्यात ड्रग्ज सापडत असताना पोलीस झोपा काढत आहेत का? ड्रग्जचा पैसा आता राजकारणात मोठ्या प्रमाणावर फिरवला जात आहे. ठाण्यातील सत्ताही अशाच अंमली पदार्थांच्या पैशावर मिळवण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच डोंबिवलीतील बेपत्ता नगरसेवकांचा उल्लेख करताना त्यांनी लापता लेडीज चित्रपटाचा दाखला देत लापता जेंटस कुठे आहेत? असा उपरोधिक टोला लगावला.