देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस फेल… संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले खानांची खानावळ…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली असून, मोदींना खोटं बोलण्याचा आजार असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नियमबाह्य, बेकायदेशीर आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन करत असतात. कायदा माझं काय वाकडं करणार या भूमिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम असतात. देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा एक भयंकर राष्ट्रीय आजार जडलेला आहे, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. सध्याच्या घडीला देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असून हे दोघेही फेल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका केली. देशाचे नेतृत्व काँग्रेसशिवाय दुसरे कोणीही करू शकत नाही, हे मोदी आपल्या वर्तनातून वारंवार दाखवून देत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
आता ही ढोंगं त्यांनी बंद करावीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश आता गांभीर्याने पाहत नाही. ५४३ जागा जर दिल्या तर भाजपमधील थोर पुरुषांच्या जागा राखीव होऊ शकतात, असा टोला त्यांनी लगावला. मोदींना देश कायम पेटवायचा असतो, मग तो विषय लव्ह जिहादचा असो किंवा कुणी काय खावे यावरून असो. पुलवामामध्ये जवान शहीद झाले, तेव्हा तिथल्या महिलांचा आक्रोश त्यांना दिसला नाही, आता ही ढोंगं त्यांनी बंद करावीत कारण जग त्यावर हसत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी
यावेळी संजय राऊतांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांच्या जुन्या ट्वीटचा दाखला देत ताशेरे ओढले. तुम्ही महिला विधेयकाची भ्रूणहत्या नाही, तर गो-हत्या केली आहे. २०२३ मध्ये हे विधेयक मंजूर झाले, तरीही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या फसवणुकीबद्दल पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. महाराष्ट्रावर या बिलावरून कसा अन्याय झाला आहे हे स्पष्ट दिसते. दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय करून भाजप तोडा-फोडा आणि राज्य करा या तत्वाने वागत आहे, म्हणूनच आम्ही ठामपणे उभे राहिलो आहोत,” असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस फेल
आता टीसीएस (TCS) प्रकरणावरून देशावर संकट आले असताना, सर्व सूत्रे हिंदूंच्या हाती आहेत, मग ‘हिंदू खतरे मे’ कसे? जर खरोखरच कुणी धोक्यात असेल, तर आम्ही खंबीर आहोत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल आहेत. नरेंद्र मोदींचे ते चेले आहेत. देशात नरेंद्र मोदी फेल आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फेल आहेत. ते फेलच आहेत. ते अपयशीच आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.
बॉलिवूडमधील खान लोकांमुळे लव्ह जिहाद होतोय. त्यामुळे त्यांचे चित्रपट पाहू नका. हे तुमच्या देवेंद्र फडणवीसांना सांगा किंवा नरेंद्र मोदींना सांगा. खानांची खानावळ त्यांनीच चालवली आहे. त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनाच सांगा. त्यांची भूमिका चुकीची आहे एवढंच मी सांगतो. या देशात हिंदी सिनेसृष्टीत जर आपण एक इतिहास पाहिला तर दिलीप कुमार पासून मीना कुमारीपर्यंत मधुबाला ही जी नाव तुम्ही घेता हे सर्व मुस्लीम समाजातून आले त्यांनी आमची सिनेसृष्टी समृद्ध केली. शाहरुख, सलमान हे आताचेच आहेत. नारायण राणेंच्या वाढदिवसाला किती खान गेले होते. आपण या राज्याचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी जपून बोललं पाहिजे, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.