Sanjay Raut : राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागले – संजय राऊत
Sanjay Raut : पीएम मोदी आज मुंबईत येत आहेत, त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, "पहलगाममध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला. त्यात 6 जण महाराष्ट्रातील होते. निदान सात दिवस दुखवटा पाळायला पाहिजे होता. पंतप्रधान 24 तासांच्या आत बिहारमध्ये गेले आणि हे राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवतात. त्या किंकाळ्या अजूनही आमच्या कानात आहेत" असं संजय राऊत म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस नक्कीच राजकारणात आहेत ना, त्यांनी राजकारण सोडलय का? त्यांचं आकलन, वाचन, चिंतन, गेल्या दहावर्षापासून राहुल गांधी सातत्याने जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. यांच्या कानात बोळे भरलेत का? भाजपची संसदेतील भाषण बघा, जातीय जनगणनेला कोणी विरोध केलाय? हा संसदेतला रेकॉर्ड तुम्हाला सांगेल. हा सामाजिक न्यायाचा विषय आहे” असं संजय राऊत म्हणाले. “या देशातल्या बहुजन समाजासंदर्भात हा निर्णय महत्त्वाचा आहे. सरकारने, कॅबिनेटने निर्णय घेतला, त्यांचे आभारी आहोत. या निर्णयाचे श्रेय फक्त राहुल गांधी यांना जातं” असं संजय राऊत म्हणाले.
“सरकार मोदींच, सिस्टिम राहुलची चाललं आहे. राहुल गांधी यांनी हा विषय उचलून धरल्यामुळे जातीय जनगणनेचा निर्णय झाला” असा दावा संजय राऊत यांनी केला. “पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. त्यावरुन समजाच लक्ष बाजूला व्हावं, म्हणून देश युद्धाच्या छायेत असताना, त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बिहार, पश्चिम बंगालची निवडणूक आहे. राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागले” असं संजय राऊत म्हणाले. “जातीय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलला. तो पर्यंत या देशातील जनतेला माहितही नव्हतं. विरोध भाजपचा होता. कॅबिनेटच्या निर्णयाच स्वागत करतो, राहुल गांधी यांचं अभिनंदन करतो” असं संजय राऊत म्हणाले.
हिमालय दिल्लीत उरलाय का?
“प्रगतीचा आढावा आणि प्रगती पुस्तकावर शेरा यात फरक आहे. दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला. हिमालय कोण? हिमालय दिल्लीत उरलाय का? महाराष्ट्रात सहयाद्री कोण? एक सीएम आणि दोन डीसीएम हे महाराष्ट्राला आलेलं टेंगुळ आहे. एक टेकाड आहे, दोन टेंगुळं आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच प्रगतीपुस्तक जाहीर केलं. ट्रम्पने सुद्धा अमेरिकेत 100 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र किती कमजोर झाला, त्याची श्वेतपत्रिका काढा. 106 हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा तुमचा अधिकार नाही, लायकी शब्द वापरणार नाही. 106 हुतात्म्यांच्या स्वप्नांना संपवून टाकलं. व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
‘तो अमावस्येचा दिवस होता’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी प्रवेश केला. त्यांच्या मुलीला 92 टक्के मिळाले, त्यावर सुद्धा संजय राऊत बोलले. “सागर बंगल्यावर अभ्यास केला, म्हणून 92 टक्के मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 92 टक्के म्हणजे महाराष्ट्राला 92 टक्के. ते आता वर्षावर गेलेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. मला आशा आहे, तिथे गुवहाटीवरुन आणलेली जमिनीत पुरलेली शिंग बाहेर काढून विसर्जित केली असतील. त्यांच्या जीवनात सुख, शांती नांदो ही अपेक्षा. शिंग निघालीत का, ते पहावं लागेल, माझ्याकडे जास्त माहिती आहे. मी चार दिवसांपूर्वी गुवहाटीमध्ये होतो. तो अमावस्येचा दिवस होता. मंदिरात जाऊन मी चर्चा केली. मला मिळालेली माहिती धक्कादायक आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला. शरद पवार म्हणाले राज-उद्धव एकत्र आले तर चांगलं आहे, त्यांच्या तोंडात साखर पडो असं संजय राऊत म्हणाले. राज ठाकरेंसोबत युती करण्यावर उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत असं संजय राऊत म्हणाले.
